छत्रपती संभाजीनगर: बीड (Beed) जिल्ह्यात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. बीड जाळपोळीच्या घटनेत गृहमंत्री आणि स्थानिक मंत्र्यांवर शंका असल्याचं म्हणत रोहित पवारांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे आरोप केले आहे. तसेच, बीड पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, त्यांना कोणाचे आदेश होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवारांच्या या आरोपावरून राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. 


काय म्हणाले रोहित पवार? 


छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषेदत बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "बीडमध्ये आंदोलन करायला आले होते ते लोकं खूप प्रोफेशनल होते. त्यांच्याकडे फॉस्फरस बॉम्ब होते. त्यांनी जाळपोळ करणाऱ्या प्रत्येक घराला विशीष्ट नंबर दिला होता. गाडीत विशीष्ट प्रकारचे आणि आकाराचे दगड होते. यासाठी एकूण 3 टीम होत्या.  यातील एक टीमने सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, दुसरी टीम लोकांचे मोबाईल घ्यायची, आणि तिसरी टीम जाळपोळ करायची. महिला, लहान बाळ घरात असल्याचे लोकांनी सांगितले. मात्र, तरीही आम्हाला फरक पडत नाही असे हे लोकं म्हणत होती. जाळपोळ करणारी सगळी लोक ड्रग्ज घेऊन होती असे आम्हाला वाटते, असेही रोहित पवार म्हणाले. 


गृहमंत्री आणि स्थानिक मंत्र्यांवर शंका? 


जाळपोळ करण्यासाठी आलेल्या लोकांना काही नागरिकांनी चोप दिला. त्यामुळे जखमी झालेल्या त्या लोकांना घेण्यासाठी दुसरी टीम रुग्णवाहिका घेऊन पोहचले आणि सर्व गायब झाले. त्यामुळे हे सर्व काही मुद्दाम केल्याचे वाटत आहे. तर, ओबीसींना टार्गेट केले का? असे अनेक प्रश्न उपस्थित होते. तसेच काहीच करू नका असे पोलिसांना आदेश होते का? असाही प्रश्न नागरिकांना पडलाय. या घटनेच्या वेळी बाजूला उभा असलेल्या तरुणांवर देखील पोलिसांकडून कारवाई केली जात असून, ज्यात मराठा तरुणाचा समावेश आहे. यामुळे मुख्य आरोपी सुटले आणि निष्पाप लोकं अडकत आहे. जाती जातीत दंगली केल्यास लोकसभेत महासत्तेला फायदा होईल, यासाठी हे केले जात आहे का? असा प्रश्न पडत आहे. बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनास्थळी गृहमंत्री यांनी जायला पाहिजे होते. माझा रोष इतकाच आहे की, पोलिसांनी कारवाई का केली नाही. पोलीस कारवाई करत नसेल तर गृहमंत्री आणि तिथल्या मंत्र्यांवर शंका होऊ शकते, असे रोहित पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News : बीडमधील हिंसाचाराची एसआयटी चौकशी व्हावी, धनंजय मुंडेंची मागणी