मुंबई: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि वादग्रस्त वक्तव्य तसेच ऑडिओ क्लिप हे जणू समीकरणच बनून गेलंय. कारण त्यांची आणखी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड यांनी छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) कथित शिवीगाळ केली आहे. मराठा आरक्षणावरून भुजबळांच्या वक्तव्यांमुळे गायकवाड नाराज असून त्याच रागातून त्यांनी ही कथित शिवीगाळ केली आहे. मराठा आरक्षणावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात आधीच मतभेद आहेत. आता त्यात आता गायकवाड यांच्या शिवीगाळीमुळे महायुतीतला वाद अधिक बळावण्याची शक्यता आहे. 


कल्याणच्या दुर्गेश बागुल नावाच्या एका व्यक्तीने आमदार संजय गायकवाड यांना कॉल केला. त्यानंतर संजय गायकवाड चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. त्यांनी त्यावेळी भुजबळांना शिविगाळ केली. त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मात्र यानंतर आता शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाले संजय गायकवाड? 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांना लाथ घालून मंत्रिमंडळातून हाकलून द्या असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेले आहे. 


संजय गायकवाड म्हणाले की, छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करून मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा. एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही. असं असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. भुजबळांमध्ये जर जातिवाद शिरला असेल तर ते मंत्रीपदावर राहायच्या लायकीचे नाहीत. त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवा हे माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन आहे.


आमदार संजय गाडवाड यांनी भुजबळांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड यांना भावना मांडण्याचा अधिकार आहे, मात्र गायकवाडांची भाषा योग्य नाही.  मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय. 


ही बातमी वाचा: