Ram Mandir Inauguration Chhatrapati Sambhaji Nagar : उद्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir Inauguration) आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे 'राम उत्साहा'साठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात धर्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. कुठे 109 कुंडात्मक महायाग आयोजित करण्यात आले आहेत, तर वेगवेगळ्या 196 मंदिरांत प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केले आहेत. 


आयोध्यामध्ये होणाऱ्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील सुमारे 196 मंदिरात प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम होणार आहे. सोबतच शहरातील वेगवेगळ्या भागात प्रभू श्रीराम रथयात्रा काढण्यात येत आहे. सोबतच श्रीराम मंदिर निर्माणाचा इतिहास लेझर शोच्या माध्यमातून नागरिकांना दाखवण्यात येत आहे.  22 जानेवारी रोजी आयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याने, त्या अनुषंगाने शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळत आहे. 


शहरात 109 कुंडात्मक महायागचे आयोजन


राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारातून शहरात 109 कुंडात्मक महायागचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जानेवारी रोजी आयोध्या येथे प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात 108 कुंड आणि एक प्रधान श्रीराम कुंड असे एकूण 109 कुंडात्मक महायाग सुरू आहे. दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहात आम्ही हा श्रीराम प्रतिष्ठापना दिवस साजरा करत असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं.




प्रत्येक ग्राहकाला गोड पदार्थ मोफत देणार 


देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असेच काही वातावरण पाहायला मिळत आहे. अशात शहरातील एका हॉटेल चालकाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. निराला बाजार भागातील हॉटेल व्यवसायिक असलेले किशोर शेट्टी यांनी 22 तारखेला आपल्या चारही हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला गोड पदार्थ मोफत देणार असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक ग्राहकाला गोड प्रसाद म्हणून देणार असल्याचा त्यांनी म्हटले.


तब्बल 551 किलोचा मोतीचूर्ण लाडू 


अयोध्यामधील राम मंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तब्बल 551 किलोचा मोतीचूर्ण लाडू बनवण्यात आला आहे. हा लाडू उद्या शहरातील किराडपुरा येथील श्रीराम मंदिरामध्ये श्री रामाला अर्पण करून, नंतर भक्तांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात या लाडूची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.


वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे आकाश कंदील


छत्रपती संभाजीनगरमध्ये राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने आजीक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने  शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे आकाश कंदील लावण्यात आलेत. आज संध्याकाळी फटाक्याची मोठी अतिशबाजी देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील राम भक्त 'राम उत्साहा'साठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त...


आयोध्यामध्ये होणाऱ्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे. सुरक्षेसाठी शहर पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफच्या 3 आणि  एसआरपीएफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या आहेत. 4  उपयुक्त, 8 सहाय्यक आयुक्त, 23 पोलीस निरीक्षक, 96 सहाय्यक निरीक्षक आणि 3 हजारपेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शिवाय 500 होमगार्ड आणि जलद कृती दलाची एक तुकडी आणि काही महत्त्वाच्या धार्मिक स्थळांबाहेर ही शस्त्रधारी जवान तैनात असणार. दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणी जर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचं नाव पोलिस प्रशासनाला कळवा आणि कुठल्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये अस आवाहन पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Anupam Kher : "जय श्री राम! 'या' दिवसाची खूप वाट पाहिली"; अयोध्येला जाताना अनुपम खेर यांना अश्रू अनावर