Anupam Kher Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापनेची देशभर जय्यत तयारी सुरू आहे. देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. राजकारणी नेत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) अयोध्येला (Ayodhya) रवाना झाले आहेत. ज्या दिवसाची एवढी वर्षे वाट पाहिली तो दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
अनुपम खेर आज अयोध्येला रवाना झाले आहेत. विमानात बसण्याआधी त्यांनी सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी खास पोस्टदेखील शेअर केली आहे. या व्हिडीओ आणि पोस्टमध्ये त्यांनी राम आणि राम मंदिराबद्दल भाष्य केलं आहे. काश्मिरी पंडितांप्रमाणे पोशाख परिधान करुन ते प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.
अनुपम खेर अयोध्येला रवाना
अनुपम खेर व्हिडीओमध्ये म्हणत आहेत,"जय श्री राम! आज मी अयोध्येला रवाना होत आहे. मनात खूप विचार सुरू आहेत. भावना व्यक्त करणं कठीण होत आहे. हिंदू आणि प्रभू रामाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. देशभरात राम मंदिराच्या उद्घाटनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. एक दिवस राम मंदिर नक्की होणार, असे माझे आजोबा नेहमी म्हणायचे".
काश्मिरी पंडितांचा पोशाख परिधान करुन मी सोहळ्याला उपस्थित असणार : अनुपम खेर
अनुपम खेर पुढे म्हणाले,"काश्मिरी पंडितांचा पोशाख परिधान करुन मी सोहळ्याला उपस्थित असणार आहे. सर्वत्र 'जय श्रीराम'चा जयघोष पाहायला मिळत आहे. कारसेवकांसह अनेकांनी 'या' दिवसाची प्रतीक्षा केली आहे. या सगळ्यांच्या वतीने मी उद्या पूजा करणार आहे. अश्रू अनावर झाले आहेत. 22 जानेवारी 2024 हा ऐतिहासिक दिवस पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप-खूप आभार".
राम मंदिराच्या उद्घाटनादरम्यान 'हे' सेलब्रिटी उपस्थित
अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास आणि मोहनलालसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.
संबंधित बातम्या