अहमदनगर: गेल्यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथे एका मोठ्या सोहळ्यात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम महाराज यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील एका संपूर्ण मुस्लिम कुटुंबाने हिंदू कुटुंबात प्रवेश केला होता. मात्र, दीक्षा घेतल्यानंतर किंवा धर्मांतर केल्यानंतर केवळ 215 दिवसातच हे संपूर्ण कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मामध्ये (Muslim Religon) प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहे. त्याचं कारण ठरलं आहे पूर्वीचे जमीर शेख (zameer shaikh) आणि आत्ताचे शिवराम आर्य (Shivram Arya) यांची आठ वर्षांची मुलगी आशिया शेख उर्फ अश्विनी आर्य. अश्विनी आर्य हिच्या मेंदूमध्ये गाठ झाल्याने तिच्यावरती एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, शिवराम आर्य यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांच्यासमोर मुलीची शस्त्रक्रिया कशी करावी असा प्रश्न आहे त्यांनी काही हिंदू सहकाऱ्यांना आर्थिक मदत मागितली. मात्र, त्यांना ती होऊ शकली नाही.


त्यांच्या कागदपत्रांवर काही ठिकाणी मुस्लिम नाव आहे, तर काही ठिकाणी हिंदू नाव आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देखील घेता येत नाही. त्यामुळे त्यांची कोंडी झाली असून जर आपण पुन्हा मुस्लीम धर्मात प्रवेश केला तर निदान आपल्या रक्ताचे नातेवाईक आपल्या मदतीला येतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या बकरी ईदच्या (Bakra Eid 2024) दिवशी आपण मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकतेत असल्याचे शिवराम आर्य यांनी सांगितले.


जमीर शेख यांनी हिंदू धर्मात का प्रवेश केला होता?


गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला होता. जमीर शेख यांनी हिंदू धर्म स्वीकारतांना बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचे आभार मानले होते. लहानपणापासून आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करतो. बागेश्वर धाम यांचे व्हिडिओ आपण मोबाईलवर पहिले आणि आपल्यातील सनातनी जागा झाला. त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिकारी यांच्या मदतीने आपण आज इथे पोहोचलो. सनातन धर्मावरील श्रद्धेमुळेच आपण धर्मांतर करीत असल्याचे जमीर शेख उर्फ शिवराम आर्य यांनी सांगितले होते.  


आणखी वाचा


घरवापसी! बागेश्वर धामच्या दरबारात जमीर शेख कुटुंबीयांनी स्वीकारला हिंदू धर्म


छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न; पोलिसांत गुन्हा दाखल; शहरात एकच खळबळ