Marathwada Drought Updates: छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा दुष्काळानं (Marathwada Drought) पुरता होरपळून गेला आहे. अनेक गावांची आणि वाड्यांची तहान आता टँकरवर अवलंबून आहे. तर दुसरीकडे चारा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरं विकण्यासाठी बाजारांमध्ये गर्दी केली आहे. दुष्काळामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना अवकाळीनंही शेकडो हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला आहे. 


मराठवाड्यात पाणी या दोन अक्षरी शब्दाभोवती ग्रामीण असो वा शहरी जीवन फिरतंय. सध्या नळाला पाणी आणि गावा टँकर येण्याच्या आनंदाएवढी दुसरी कुठलीही गोष्ट कुठली नाही. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आणि शहरात पाण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली जात आहे. आत्तापर्यंत आपण पाण्यासाठी दिवसा सुरू असलेली धडपड पाहिली असेल. 'एबीपी माझा'नं जवळपास अख्खा मराठवाडा संपूर्ण रात्र कशी पाण्यासाठी जागून काढतंय, याचा ग्राउंड रिपोर्ट केलाय. पाण्यासाठी दिवसा केली जाणारी वणवण आपण पाहिलीये, पण पाण्यासाठी रात्रीचा दिवस करून एक एक थेंब मिळवणं, हे दृश्य तितकंच भीषण आणि मन हेलावणारं होतं. 


एबीपी माझाचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी भीषण वास्तव सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. यात एक थेंब पाण्यासाठी धडपडणाऱ्या जीवांचं भीषण वास्तव पाहायला मिळालं... 


वेळ रात्री दहा वाजताची गंगापूरच्या अंबळनेरच्या विहिरीवर टँकर भरत होता. 10 वाजून 18 मिनिटांनी टँकर फुल्ल झाला आणि तो कुण्या एका गावाच्या दिशेनं रवाना झाला. टँकरनं सेल्फ मारला आणि एबीपी माझाचा टँकर सोबतचा प्रवास सुरू झाला. तोवर ड्रायव्हरला गावकऱ्यांचा फोन सुरू झाला होता. कुठवर आलाय? किती वेळ लागेल? अशी सगळी चौकशी फोनवर गावकरी करत होते.  


रात्रीचे अकरा वाजले अजून दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करायचा होता. गाव खेड्याचा रस्ता असल्यामुळं आणि रात्री उशिरा ट्राफिक नसल्यानं आम्ही ड्रायव्हर नागेश शिरसाटसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, कधी अकरा वाजता, कधी बारा वाजता, कधी पहाटे तीन वाजता तर कधी सकाळी सहा वाजता आम्ही टँकरनं गावात  पाणी देतो. गावाचे लोक त्याही वेळेस वाट पाहत असतात, तीन हॉर्न दिले की, लोक जागे होतात आणि पाणी भरण्यासाठी गर्दी करतात.


पाहता पाहता वाहेगावात टँकर दाखल झाला. गावात टँकर पोहोचताच, सर्वांनी गर्दी केली. कोणी मोठ्या टाक्या घेऊन, तर कुणी हंडा कळशी घेऊन टँकरकडे पाण्यासाठी धाव घेतली. मिळेल तेवढं आणि हाती लागेल त्या भांड्यात पाणी घेऊन अदगी एक एक थेंब सांभाळून भरला जात होता. गावातील अगदी लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सारेचजण टँकरभोवती जमलेल्या गर्दीत उपस्थित होते. कुणी भरलेली हंडा, कळशी, बादली घरात रिकामी करून पुन्हा पाण्यासाठी टँकरकडे धाव घेत होतं. तर काहींची त्याच रांगेत पाणी मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. 


घड्याळात आता रात्रीचे पावणेदोन वाजले होते. एबीपी माझा आता शहरात पोहोचला होता. शहरातील हनुमान टेकडी भागात पाणी आलं होतं. इथेही लोकं पाण्याची वाट पाहत जागी होती. रात्र मध्यात येऊन पोहोचली होती. मात्र, ऐन मध्यरात्री रातकिड्यांना नाहीतर नळाचं पाणी जास्त मिळावं म्हणून सुरू असलेल्या धडपडीचा आवाज कानी पडत होता. तिथेच बाजूला होती निकुंज नगर कॉलनी... आख्खी कॉलनी जागी होती. कारण आठ दिवसांतून एकदा पाणी आलं होतं, तेही एक तास येणार असल्यानं पुरुष मंडळींची पाणी भरण्याची लगबग सुरू होती. 


आता सहज म्हणून घड्याळ पाहिलं तर, पहाटेचे साडेचार वाजले होते. एबीपी माझाचा कॅमेरा छत्रपती संभाजीनगर पैठण रोडवर होतो. याच पैठण रोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या वॉलमधून पाणी भरणं सुरू होतं. आता खरी सकाळ झाली होती, पण इथे नागरिकांची पाण्याच्या एकएका थेंबासाठी दिवसाची रात्र सुरू झाली होती.