छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) हे नाव आज राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेत आले आहे. त्यामुळे, मनोज जरांगे यांना आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील एका हॉटेल (Hotel) चालकाने देखील मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी एक भन्नाट ऑफर सुरु केली आहे. त्यामुळे या ऑफरची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कारण या हॉटेलमध्ये मनोज नाव असलेल्या व्यक्तीला थेट मोफत जेवण देण्यात येत आहे. मात्र, यासाठी  अट देखील ठेवण्यात आली आहे. 


मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु केले. दरम्यान, यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारच्या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होऊ लागला. पाहता-पाहता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु झाले. तर, मनोज जरांगे यांनी देखील उपोषणावर ठाम असल्याचे सांगत आंदोलन सुरु केले. तेव्हापासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळताना पाहायल मिळत आहे. तसेच, आगळ्या वेगळ्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना ठिकठिकाणी पाठिंबा दिला जात आहे. दरम्यान, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी देखील जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी एक भन्नाट ऑफर सुरु केली आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी येणाऱ्या मनोज नावाच्या व्यक्तीला मोफत जेवण देण्याची त्यांनी घोषणा केली आहे. पण यासाठी मनोज नावाच्या व्यक्तीने स्वतःचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे, अशी अट ठेवण्यात आली आहे. 


हटके ऑफरची परिसरात जोरदार चर्चा


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड गावाजवळ असलेल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अमृत हॉटेल आहे. तर, या हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने आहेत. भोजने यांनी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. ज्यात त्यांनी 'मनोज' नावाच्या व्यक्तीला आधार कार्ड दाखवून मोफत जेवण दिले जात असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या हटके ऑफरची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 


काय आहे नेमकी ऑफर? 


बाळासाहेब भोजने यांनी आपल्या हॉटेलच्या बाहेर एक बोर्ड लावला आहे, ज्यात म्हटले आहे की,“ ज्या पध्दतीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभारून अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकत्रीत केले. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय किंवा इतर ताकदीचे पाठबळ नसतांनाही जर आपले ध्येय निश्चित असेल व समाजासाठी चांगले कार्यकरण्याची निर्मळ निस्वार्थ भावना मनात असेल तर एकटा माणूस काय करू शकतो हे मनोज जरांगे पाटीलासारख्या लढावय्या योध्याने दाखवुन दिले. त्यांच्या कार्याला मनापासुन सलाम. मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आमच्या मनात असलेला आदर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणुन 'मनोज' नावाच्या व्यक्तीला आमच्या हॉटेल अमृत प्युअर व्हेज पाचोडमध्ये मोफत जेवण देत आहोत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मनोज जरांगे आजपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; धाराशिव, सोलापुरात तोफ धडाडणार, कुणावर निशाणा साधणार?