SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरू असून, या परीक्षांमध्ये कॉपी केली जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून मोठा गाजावाजा करत कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा दावा केला होता. मात्र या अभियानाला शिक्षण क्षेत्रातील लोकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागात (Chhatrapati Sambhajinagar Division) आतापर्यंत बारावी परीक्षेदरम्यान (HSC Exam) दहा दिवसांत 97 कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले आहे. ज्यात सर्वाधिक जालना जिल्ह्यात कॉपीचे प्रकार समोर आले आहे. 


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. तर याच परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून, शिक्षण मंडळासह महसूल, पोलीस विभागाचीही बैठी पथके शाळा, महाविद्यालयात आहेत. तसेच शिक्षण विभागातील विविध भरारी पथकांकडून परीक्षा केंद्रांना भेटी देऊन, पाहणी करण्यात येते. मात्र असे असताना परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत बारावी परीक्षेदरम्यान दहा दिवसांत 97 कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले आहे. ज्यात जालना जिल्ह्यात 38 कॉपी बहाद्दरांना पकडले असून, यानंतर हिंगोलीमध्ये 32, छत्रपती संभाजीनगर 26 व बीड 01 अशी कॉपी केसेसची संख्या आहे. विशेष म्हणजे परभणीमध्ये अद्यापपर्यंत एकही कॉपी केस झालेली नाही. 


औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांतून 1 लाख 69 हजार विद्यार्थी बारावी परीक्षा देत आहेत, तर  दहावीसाठी एकूण 1 लाख 80 हजार 210 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महसूल विभागाची दहा, तर शिक्षण विभागाची सहा अशी 16 पथके नियुक्त करण्यात आले आहे. तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठ्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. विभागातील प्रत्येक जिल्ह्यात अशाच प्रकारे पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कॉपी रोखण्यासाठी असा बंदोबस्त असतानाही शंभर टक्के कॉपी प्रकार रोखण्यात प्रशासनाला यश येत नसल्याचे चित्र आहे.


बुलढाण्यात पेपर फुटला, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक 


छत्रपती संभाजीनगर विभागात कॉपीच्या घटना समोर येत असताना, बुलढाणा जिल्ह्यात पेपर फुटीची घटना समोर आली आहे. तर या पेपर फुटी प्रकरणामध्ये दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर 99 जणांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपीचा प्रकार केला जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे कॉपी पुरवून पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार समोर आल्यावर व्हॉट्सॲप ग्रुप डिलीट करण्यात आला आहे. तर याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडून डिलीट करण्यात आलेला डेटा रिकव्हर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


HSC Exam : बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीची मुंबई कनेक्शन; विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये पेपर, तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI