Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद जिल्ह्याचे (Aurangabad District) नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध केला आहे. दरम्यान यासाठी जलील यांनी शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र या उपोषणानंतर अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. मनसेकडून (MNS) जलील यांच्यायाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, तर तिकडे या उपोषणात औरंगजेबाचे पोस्टर झळकले. त्यामुळे यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, नामांतरच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळतोय. 


जलील यांचे उपोषण तर मनसेकडून स्वाक्षरी मोहीम 


छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाला विरोध करत जलील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. यावेळी शेकडो नागरिकांनी या उपोषणाल पाठींबा दिला. दरम्यान एकीकडे उपोषण सुरु असताना, त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून शहरातील टीव्ही सेंटर भागात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह मोठ्याप्रमाणावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करत छत्रपती संभाजीनगर नावाला आपला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे नामांतराच्या मुद्यावरून एमआयएम विरुद्ध मनसे असा वाद पाहायला मिळत आहे. 


उपोषणात झळकले औरंगजेबाचे पोस्टर! 


दरम्यान शनिवारपासून नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. मात्र याच उपोषणाच्या ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर झळकवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. एक तरुण हातात औरंगजेबाचा पोस्टर घेऊन उपोषणाच्या ठिकाणी दाखल झाला. पाहता-पाहता याठिकाणी जिंदाबाद जिंदाबाद औरंगाबाद जिंदाबादच्या घोषणा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे इतर तरुणांनी जल्लोष सुरु केला. या सर्व घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मात्र जलील यांनी या तरुणाचा एमआयएम पक्ष उपोषणाशी कोणतेही संबध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर आंदोलनाला बदनाम करण्यासाठी असे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. 


राजकीय प्रतिक्रिया! 


दरम्यान या सर्व घटनेवरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहे. अशाप्रकारे कोणेही कायदा सुव्यवस्था खराब करण्याचे काम करू नयेत अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. तर औरंगजेबावर एवढंच प्रेम असेल तर जलील यांनी आपल्या मुलांचे नावं औरंगजेब ठेवावे  अशी टीका ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. तसेच शिवरायांच्या पावन भूमीत औरंग्याचं समर्थन कशासाठी असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhajinagar: मोठी बातमी! नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले 'औरंगजेबा'चे होर्डिंग्ज