Chhatrapati Sambhaji Nagar City Police : छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, शहरातील शांतता भंग करून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना एमपीडीए कायद्यांर्तगत स्थानबद्ध केले आहे. या दोन्ही आरोपींच्या छत्रपती संभाजीनगर शहर (Chhatrapati Sambhaji Nagar City) हद्दीत वाढती गुन्हेगारी आणि धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस


आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दोघांच्या विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 चे कलम 3 (1) अन्वये स्थानबद्धतेचा आदेश जारी केले आहे. सातारा पोलीस ठाणे हद्दीतील अक्षय ऊर्फ भैय्या रमेश वाहुळ (वय 22 वर्ष, रा. एकता कॉलनी, सातारा परिसर) आणि पोलीस ठाणे एमआयडीसी सिडको हद्दीतील शेख इरफान शेख लाल (वय 27 वर्षे, रा. भारतनगर, गारखेडा गांव, नुराणी मस्जीत जवळ) असे या दोन्ही आरोपींचे नावं आहेत. 


पहिली कारवाई...


यातील आरोपी शेख इरफान शेख लाल याच्यावर पोलीस ठाणे एमआयडीसी सिडको येथे जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, बेकायदेशीरपणे अडवणे, चोरी करणे, गोडावून फोडून चोरी करणे, आगळीक करुन मालमत्तेचे नुकसान करणे, इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धाकदपटशा इत्यादीबाबत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले असून, त्यास हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. 


दुसरी कारवाई...


अक्षय ऊर्फ भैय्या रमेश वाहूळ याच्यावर पोलीस ठाणे सातारा येथे खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे, इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे, गृह अतिक्रमण करणे, नुकसान करून आगळीक करणे, चोरी करणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमानित करणे, धाकदपटशा करणे इत्यादीबाबत गुन्हे दाखल आहेत. त्यास गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी त्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) (अ) (ब) आणि फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 107 अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. मात्र तरीही त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याने, त्याच्या विरोधात स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले आहे. तर त्याला हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! छ. संभाजीनगरमधील राड्यातील गायब झालेल्या आरोपींना पोलीस करणार फरार घोषित