Chhatrapati Sambhaji Nagar News: अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain)  मराठवाड्यातील शेतकऱ्यांना (Marathwada Farmers) मोठा फटका बसला आहे. दरम्यान असे असताना झालेल्या नुकसानीचे पंचनामे अल्पप्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन 22 मार्चपर्यंत विभागातील पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Aastik Kumar Pandey)  यांनी कन्नड तालुक्यातील शेतपिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेतला. 


अवकाळी पावसामुळे कन्नड तालुक्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कन्नड तालुक्यातील शेतपिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेतला आहे. तर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत, त्या पंचनाम्यांचीही पाहणी करुन उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करण्याचे संबंधिताना निर्देश दिले. यावेळी कन्नड तालुक्यातील पिशोर, पळशी, रामनगर, साखरवेल परिसरातील तुकाराम हुनमंत निर्मळ, सर्जेराव गिरजाबा नलावडे, श्रीमती कमलबाई कैलास गायकवाड, नारायन बंडु डहाके, आदि शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतींची जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी धीर दिला. 


भारंबा तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी 


दरम्यान यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भारंबा तांडा येथील शाळेची पाहणी केली. गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या. गावकऱ्यांनी शाळकरी मुलांना येणाऱ्या दैनंदिन अडचणीची माहिती दिली. शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षात घेता अतिरिक्त शिक्षक देण्याची मागणी तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करता जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ यासंबधी कार्यवाही करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.  


 बाजारसांवगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट


तसेच बाजारसांवगी येथील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धीनी केंद्रास भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी जाणून घेतल्या. तसेच केंद्रातील कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली. केंद्रातील कर्मचारी निवासस्थानांना भेट देत याठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षरोपणाचे कौतुक करत आणखीन मोठया प्रमाणात वृक्षरोपण करण्याच्या सुचना देखील दिल्या. तद्नंतर पशुवैद्यकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख,तहसीलदार संजय वरकड, मुख्यधिकारी नंदकिशोर भोंबे  आदी अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Marathwada: मराठवाड्यातील नुकसानीचे पंचनामे उद्यापर्यंत पूर्ण करा; केंद्रेकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश