Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) गंगापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, बायको माहेरी गेल्यावर घरी बोलवलेल्या मित्रानेच मित्राची हत्या (Murder) केली आहे. तर हत्या करून आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला नाशिक जिल्ह्यातील निफाड येथून ताब्यात घेतले आहे. योगेश शंकरराव भालेकर (वय 39 वर्षे, रा.समतानगर)  मयत व्यक्तीचे नाव असून, नवनाथ खैरे (वय 35 वर्षे, रा.गंगापूर) असे हत्या करणाऱ्या त्याच्या मित्राचे नाव आहे. 


याविषयी पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, मयत योगेश आपल्या पत्नी आणि मुलासह गंगापूरच्या समतानगर येथे वास्तव्यास आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी मुलासह आपल्या माहेरी गेल्या होत्या. घरातील मंडळी गावाकडे गेल्याने योगेश घरी एकटेच होते. त्यामुळे शुक्रवारी (17 मार्च) रोजी रात्री आपला मित्र नवनाथ खैरे याच्यासह योगेश आपल्या घरी आले. मात्र साडेआठ वाजेच्या सुमारास योगेश आणि नवनाथ या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, नवनाथ याने योगेशच्या डोक्यात लाकडी दांडा मारून त्याला गंभीर जखमी केले. तसेच योगेशची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. घरात अजून इतर कोणेही नसल्याने जखमी योगेश रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होता.


उपचार सुरु असताना झाला मृत्यू...


दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या सुमारास योगेश यांची आई त्यांच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आल्या. घरात जाताच त्यांना आपला मुलगा योगेश जखमी अवस्थेत आढळून आला. घाबरून गेलेल्या योगेश यांच्या आईने तत्काळ शेजाऱ्यांना आवाज दिला. तसेच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ याच्या मदतीने जखमी योगेश यांना गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्रभर रक्तस्राव झाल्याने योगेश यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दक्षता विभागात उपचार घेत असलेल्या योगेशचा मृत्यू झाला. 


आरोपीला नाशिक जिल्ह्यातून केली अटक...


योगेश भालेकर यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचे बंधू सचिन भालेकर यांनी गंगापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर घटना घडल्या पासून आरोपी नवनाथ फरार झाला होता. त्यामुळे त्याच्या शोधात पोलिसांचा एक पथक नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान गंगापूर पोलीस ठाण्याचे सहपोनि अशोक चौरे, बलविर बहुरे, पदमकुमार जाधव यांच्या पथकाने आरोपी नवनाथ खैरे यास नाशिक जिल्ह्यातील निफाड येथून रविवारी उशिरा अटक केली. तसेच त्याच्यात गुन्हा वाढवून खुनाचा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar: पंतप्रधान आवास योजना घोटाळा; छ. संभाजीनगर महापालिका अधिकाऱ्यांना नोटीस