Gudi Padwa 2023 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच, गुढीपाडवा (Gudi Padwa 2023)  सण मोठ्या उत्साहात राज्यभरात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. तर राज्यभरात गुढीपाडव्यानिमित्ताने वेगवेगळ्या परंपरा देखील पाहायला मिळत असतात. अशीच काही परंपरा छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील पैठणच्या थेरगावमध्ये पाहायला मिळते. कारण या गावात घरांवर पाडव्यानिमित्त उभारलेली गुढी सात दिवस डौलाने फडकवितात.  


छत्रपती संभाजीनगर शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या थेरगावात गुढीपाडव्यानिमित्ताने वेगळी परंपरा पाहायला मिळते. गुढीपाडवा सणानिमित्त गावातील नागरिक लोकवर्गणीतून अखंडित हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतात. विशेष म्हणजे चैत्र मराठी नववर्ष सणानिमित्त अखंडपणे सात दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. तर सप्ताहाची सांगता होईपर्यंत नागरिक आपल्या घरांवर पाडव्यानिमित्त उभारलेली गुढी सात दिवस कायम ठेवतात. तसेच आठव्या दिवशी हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता होताच गावकरी आपल्या घरावर उभारलेल्या 'गुढ्या' खाली उतरवतात. 


बावीस वर्षांपासून परंपरा कायम....


हरिनाम सप्ताहाचे आयोजन आणि त्यानिमित्ताने सात दिवस घरावर गुढी ठेवण्याची परंपरा थेरगावमध्ये 22  वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली होती. गावातील प्रतिष्ठीत बप्पासाहेब निर्मळ, गणपतराव निर्मळ, दादाराव नेहाले, भाऊसाहेब वाघ, बापूराव भुसारे, अशोक पाटील, कारभारी महाराज नजन, अशोक महाराज नेहाले यांच्यासह गावकऱ्यांनी एकत्र येत अखंड हरिनाम सप्ताहाची गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात केली होती. तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरु आहे. विशेष म्हणजे हरिनाम सप्ताह आणि गुढीपाडवा सण साजरा करण्यासाठी गावातील सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. तसेच या सप्ताहात गावातील सर्व समाजाचे लोक सहभाग नोंदवतात. 


शहरात निघणार गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा...


दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती संभाजीनगर शहरात हिंदु नववर्ष स्वागत समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. शहरातील गुलमंडी येथे सकाळी साडेनऊ वाजता गुढीपूजन होईल. त्यनंतर प्रथेप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा शहराचे आराध्य दैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती येथुन दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. संस्थान गणपती मंदिर ते खडकेश्वर शिवमंदिरपर्यंत ही शोभयात्रा निघणार आहे. या शोभायात्रेचे यंदाचे 18वे वर्ष असून, दरवर्षी गुढीपाडव्याला शहरात पारंपारीक पद्धतीने घोडे, उंट, चित्ररथ, सजीव निर्जीव देखावे यांच्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Gudi padwa 2023 Live Updates : गुढीपाडव्याचा सर्वत्र उत्साह, पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर