Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हा न्यायालयात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जेलमध्ये तंबाखू, सिगारेट घेऊन जाण्यास पोलिसांनी विरोध केल्याने या आरोपींनी न्यायालय परिसरातच पोलिसांवर हल्ला चढविला. धक्कादायक म्हणजे याच आरोपींनी एका पोलिसाला चावा घेत वॉरंटदेखील फाडून टाकले. हा धिंगाणा एवढ्यावरच थांबला नाही. तर एका आरोपीने भिंतीवर डोके आपटून थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हा न्यायालयात झालेल्या या धिंगाणा प्रकरणात शहरातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल युवराज पवार, गणेश रवींद्र तनपुरे व ऋषिकेश रवींद्र तनपुरे अशी आरोपींची नावे आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दीड-दोन वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेले आरोपी गणेश तनपुरे, ऋषीतेश तनपुरे आणि राहुल पवार यांच्यासह एकूण सात आरोपींना सुनावणीसाठी 8 मे रोजी न्यायालयात हजर केले होते. यावेळी अंमलदार मच्छिद्र पाडळे यांच्यासह अन्य कर्मचारी तेव्हा ड्युटीवर होते. न्यायालयाने त्यांना पुढील तारीख दिल्यावर वॉरंट घेऊन पोलिस आरोपींना घेऊन जेलकडे निघाले. मात्र पोलिसांच्या वाहनाजवळ पोहोचताच तनपुरे आणि पवार यांनी धिंगाणा सुरू केला. नातेवाइकांनी आणलेले जेवण सोबत घेऊ द्या, सिगारेट, तंबाखू घेऊन जाऊ द्या, असे म्हणत त्यांनी पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. पोलिसांनी विरोध करताच त्यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली. गणेश तनपुरेने वॉरंट फाडले. तर, राहुलने डोके भिंतीवर आपटून तुमच्या नावाने आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी कसेबसे त्यांना हर्सल जेलमध्ये नेले. त्यानंतर वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हत्या करून अंगावर केली होती लघुशंका...


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट, 2021 रोजी हनुमाननगरात कुख्यात गणेश तनपुरे, ऋषिकेश तनपुरे, मंगल तनपुरे, राहुल युवराज पवार आणि संदीप त्रिवक जाधव यांनी लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने ठेचून आकाश रूपचंद राजपूत (वय 21 वर्षे) याची निर्घृण हत्या केली होती. संतापजनक म्हणजे  या नराधम आरोपींनी रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेल्या आकाशच्या अंगावर लघुशंका करून माणुसकीला काळिमा फासला होता. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, तनपुरे टोळीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून, ते आधीपासून पुंडलिकनगर ठाण्याच्या रेकॉर्डवर आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar: डीजेच्या गाण्यावर नाचताना धक्का लागला... त्याने थेट पोटात चाकू खुपसला