Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : क्षुल्लक कारणावरून होणारे वाद थेट हाणामारी आणि जीव घेण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत जात असल्याचे घटना अनेकदा समोर येतात. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. डीजेच्या गाण्यावर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. तर वाद एवढा विकोपाला गेला की, थेट एकाच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना समोर आली आहे. ज्यात एक 21 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. शहरातील पडेगाव पोलीस कॉलनी येथे रविवारी (7 मे) रोजी ही घटना घडली असून, या प्रकरणी सोमवारी (8 मे) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्की उर्फ विकास जनार्धन भडके (वय21वर्ष सावता नगर पडेगाव छत्रपती संभाजीनगर) असे जखमी तरुणाचे नाव असून, सूरज भुजबळ असे चाकू मारणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्की उर्फ विकास जनार्धन भडके पडेगावच्या सावता नगर परिसरात आई व भाऊ यांच्या सोबत राहतो. तर विकास हा पुणे-छत्रपती संभाजीनगर अशी चारचाकी गाडी चालवून उदरनिर्वाह करतो. दरम्यान 7 मे रोजी विकासचा मित्र विक्की बोराडे याचा पडेगावच्या पोलीस कॉलनी येथे हळदीचं कार्यक्रम होता. यासाठी विकास भाऊ आकाश भडके व मित्र सागर जंगळे, इजाज यांच्यासोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता.  


रात्री 10.30 वाजेच्या सुमारास पडेगाव पोलीस कॉलनी विकास हळदीच्या कार्यक्रमात पोहचला होता. दरम्यान या कार्यक्रमाच्या ठिकाणी डीजे लावण्यात आला होता. तर याचवेळी डि.जे.च्या गाण्यावर नाचत असतांना विकासाचा भाऊ आकाश याचा त्याच्या ओळखीच्या सुरज भुजबळला धक्का लागला. त्यामुळे आकाश व सुरज भुजबळ यांच्या दोघांमध्ये भांडणे झाले.त्यामुळे विकास त्यांचे भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागला. तर विकास हा सुरज भुजबळ याला समजावुन सांगत असतानाच, त्याने त्याला  हाताचापटाने मारहाण करायला सुरवात केली. तसेच शिवीगाळ देखील करायला सुरवात केली. दरम्यान याचवेळी "मी आज तुला जिवंत सोडणार नाही" असे म्हणुन सुरजने त्याच्याकडे असलेला चाकु काढला व विकासच्या डाव्या बाजुला पोटात खुपसला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. 


शासकीय घाटी रुग्णालयात दाखल 


विकासाच्या पोटात चाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला, त्यामुळे त्याचा भाऊ आकाशने त्याला तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करुन विकासला शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार त्याला घाटीत दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घाटी रुग्णालयात जाऊन त्याचा जबाब नोंदवून घेत, गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणात छावणी पोलिसात सुरज भुजबळ विरोधात जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Chhatrapati Sambhaji Nagar: बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग, चिमुकल्या भाच्यासोबत महिलेचं अघोरी कृत्य