Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील एक व्यक्तीने संध्याकाळच्या सुमारास त्याच्या मोबाईलवरुन एका समूदायाच्या धार्मिक भावना दुखावतील अशा स्वरूपाचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून त्याच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवरून प्रसारित केला होता. यावरुन सदर व्यक्तीच्या विरोधात पोलीस ठाणे कन्नड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रसारित केलेल्या पोस्टमुळे अंधानेर गावातील काही तरुणांचे आपसांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाल्याने या भांडणातील 20 ते 25 व्यक्ती विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतरांचा शोध कन्नड शहर पोलीस घेत आहेत.
कन्नड येथील अंधानेर गावात दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन परिसरातील नागरिकांना शांततेच आवाहन केले आहे. सर्व धर्मीय नागरिकांची शांतता समितीची बैठक घेऊन सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या विरूध्द कठोर कारवाई करण्यात येत असल्याबाबत सांगितले. तसेच पोलीस सर्व परिस्थितीला हाताळण्यास सक्षम असून, अशा प्रकारे दोन समजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांची गय केली जाणार नाही, त्यांच्याविरूध्द कठोर आणि सक्त कारवाई करण्याबाबतचा इशारा दिला आहे. सध्या गावात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वादाचे लोण ग्रामीण भागातही...
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद झाल्याने, दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ओहर गावात देखील दोन गटात वाद झाल्याने तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर आता वादाचे लोण ग्रामीण भागात देखील पसरले असून, कन्नडमध्ये दोन गटात वाद झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणतेही मोठी दुर्घटना होऊ दिली नसून, गावात सध्या शांतता आहे. तर स्वतः पोलीस अधीक्षक यांनी गावात जाऊन पाहणी करत गावकऱ्यांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.
अन्यथा कठोर कारवाई केली जाईल...
सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नये, फॉरवर्ड करू नये, तसेच कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, घाईने प्रत्युत्तर देतांना अपशब्दांचा वापर झाल्यास हासुध्दा अपराध आहे. गावातील नागरिकांनी जबाबदारीने गावहिताच्या दृष्टीने आपले वर्तन ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. गावातील सामाजिक सलोखा अबाधित राखण्यास गावातील प्रतिष्ठित, जेष्ठ नागरिक, व्यावसायीक यांनी प्रमुख भुमिका बजावणे अत्यंत महत्वाचे आहे. कोणताही व्यक्ती हा धार्मिक भावना दुखावेल अशी पोस्ट करत असेल तर त्याबाबत तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती द्यावी त्याच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल परंतु कोणत्याही गैरसमजातुन कायदा हातात घेवुन गावातील शांतता भंग होईल असे कृत्य करून नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
छ.संभाजीनगरमध्ये 'त्या' रात्री काय घडलं? महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव