Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. परीक्षेदरम्यान मासकॉपी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तर सकाळी परीक्षेवेळी विद्यार्थी कोरी पानं सोडतात आणि सायंकाळी विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर सविस्तर लिहिण्यासाठी दिला जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून ऑपरेट केलं जात आहे. यामध्ये दुकानदार फक्त 300 ते 500 रुपये घेऊन विद्यार्थ्यांना मासकॉपी पुरवत आहे. जिल्ह्यातील शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राशेजारी हा सर्व प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकार?
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सुरु आहेत. मात्र याच परीक्षांमध्ये अक्षरशः मासकॉपी सुरु असल्याचे समोर आले आहे. परीक्षा सेंटरवर सकाळी परीक्षा देताना विद्यार्थी पेपर कोरा ठेवतात आणि सायंकाळी 4 ते 6 च्या वेळेत पुन्हा उत्तरपत्रिका लिहिण्यास दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राशेजारी सुरु आहे. विशेष म्हणजे यासाठी फक्त 300 ते 500 रुपये घेतले जातात. तर याबाबत चिकलठाणा पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
फोटो स्टुडिओ, झेरॉक्स दुकानदार करतात पेपर ऑपरेट
छत्रपती संभाजीनगर शहरापासून 18 किमी दूर शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र आहे. याच परीक्षा केंद्राच्या शेजारी ए. के. फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकान असून, त्यांच्याकडून या सर्व परीक्षाच्या पेपर ‘ऑपरेट’ केले जातात. यासाठी मुलांकडून 300 ते 500 रुपये दिले जातात. विशेष म्हणजे संस्थाचालकाच्या मदतीने पेपर लिहण्याची ही विशेष ‘सोय’ उपलब्ध करुन दिली जाते. या सर्व प्रकाराने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सकाळी कोरे पान अन् सायंकाळी सविस्तर उत्तरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत 'मासकॉपी'चा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे सकाळी 10 ते 11.30 आणि दुपारच्या सत्रात दुपारी 1 ते 2.30 पर्यंत पेपर असताना विद्यार्थी पेपर कोरे ठेवतात. त्यानंतर दोन्ही पेपर संपल्यानंतर दुपारी 4 नंतर वेगळा वेळ देऊन त्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी पुन्हा उत्तरपत्रिका दिल्या जातात. विशेष म्हणजे सकाळी पेपर लिहिताना उत्तरपत्रिकेत कोरी जागा सोडण्याच्या सूचना परीक्षार्थींना आधीच दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI