Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) किराडपुरा भागात 29 मार्च रोजी मध्यरात्री दोन गटात वाद झाला. पुढे दगडफेक आणि जाळपोळ देखील करण्यात आली आहे. दरम्यान तीन तास पोलिसांनी हल्लेखोरांशी लढा दिला आणि त्यांना पळवून लावलं. यावेळी पोलिसांकडून हवेत गोळीबार देखील करण्यात आला. दरम्यान या सर्व राड्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी देखील झाले. मात्र असे काय घडलं की पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला, त्या रात्री नेमकं काय घडत होते, तीन तास पोलिसांनी कसा लढा दिला? या सर्व घटनेच्या साक्षीदार असलेल्या आणि आपल्या जीवाची बाजी लावून हल्लेखोरांना पळवून लावणाऱ्या डीसीपी अर्पणा गीते आणि पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी अंगावर शहारे आणणारा त्या रात्रीचा अनुभव 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. 


सर्वच बाजूने दगडांचा मारा...


यावेळी बोलताना अर्पणा गीते म्हणाल्यात की, "त्या रात्रीच्या वेळी नियंत्रण कक्षातून फोन आला की, किराडपुरा भागात वाद झाला आहे. दरम्यान याची माहिती मिळताच मी आमच्या अधिकाऱ्यांना आपल्या पथकासह घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. तसेच मी देखील तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. याचवेळी पोलीस निरीक्षक गीता बागवडे या नाईट राऊंड असल्याने त्यांना देखील तिकडे जाण्याचे कळवले. पण तिथे जाताच आमच्यावर जमावाने थेट दगडफेक करायला सुरु केली. सर्वच बाजूने अक्षरशः आमच्यावर दगडांचा पाऊस सुरु होता. तेथील सर्व लाईट बंद करण्यात आले होते. त्यामुळे अंधारात परिस्थितीचा अंदाज घेणं अवघड होते. मात्र तरीही आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होतो. ज्यात आमच्यातले काही अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले. एक दगड माझ्यादेखील पायाला येऊन लागला. पायाला त्रास होत होता, पण माझे सहकारी ज्या पद्धतीने हल्लेखोरांना रोखण्यासाठी प्रयत्न करत होते, ते पाहून मला पायाला दुखापत झाल्याचं कळच नाही. त्याच परिस्थितीने आम्ही हल्लेखोरांना रोखण्यासाठी प्रयत्न करत होतो."


राम मंदिर जमावाने चारही बाजूने घेरलं होते


दरम्यान यावर बोलताना पोलीस निरीक्षक गीता बागवडे म्हणाल्या की, "डीसीपी अर्पण गीते यांचा फोन येताच मी नाईट पेट्रोलिंग करत असताना घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी मोठा जमाव होता आणि सुरुवातीपासून त्यांना समजवत होते, पण जमाव कोणत्याही परिस्थितीत ऐकून घेत नव्हता. दरम्यान आमच्यावर जमावाने तुफान दगडफेक सुरु केली. जमाव वेगवेगळ्या गल्लीबोळातून येत होता. त्यानंतर जमाव वाढला आणि राममंदिराच्या तीनही दिशेने जमाव जमा झाला. तसेच लाईट बंद करुन दगडफेक करण्यात येत होती. तर काही वेळाने जमाव थेट मंदिरात जाण्याच्या प्रयत्न करत होता. त्यामुळे जमाव जर मंदिरात घुसला असता तर कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता. अशा परिस्थितीत जमावाला रोखण्यासाठी आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही बळाचा वापर केला. आमचे सहकारी दगडफेकीमध्ये जखमी होत होते. जमाव अक्षरशः आमच्यावर तुटून पडत होता. आमचा जीव धोक्यात आला होता. अशापरिस्थितीत कठोर निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळे जमाव पांगला." त्या घटनेचं वर्णन करताना  गीता बागवडे डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.


VIDEO : Chhatrapati Sambhaji Nagar Rada : पायात दुखापत,हवेत गोळीबार, दंगलीची परिस्थिती हाताळणाऱ्या पोलीस अधिकारी Exclusive



इतर महत्वाची बातमी: 


Imtiyaz Jaleel : शहरात पुन्हा राडा घडवण्याचा प्रयत्न, 'मविआ'च्या सभेपूर्वी जलील यांचं मोठं वक्तव्य