Chhatrapati Sambhaji Nagar : राज्यात (Maharashtra) सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. दुपारच्या दरम्यान सूर्य आग ओकत असल्याचं चित्र सध्या राज्यात दिसत आहे.  उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. एकीकडे आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे मराठवाड्यात (Marathwada) पैठण तालुक्यातील बिडकिन येथे 30 वर्षीय युवकाचा रविवारी उष्माघाताने (Heat Stroke) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मराठवाडा पैठण तालुक्यातील हा पहिला बळी असल्याची चर्चा सुरू आहे.


 


मराठवड्यात उष्माघाताचा पहिला बळी


जैनपुर येथे फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला अचानक चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजेदरम्यान घडली आहे. गणेश राधेश्याम कुलकर्णी (वय 30) असे मयताचे नाव आहे. गणेश हा मित्र तसेच नातेवाईक यांच्यासोबत जैनपुर येथे फिरण्यासाठी गेलेला असताना अचानक चक्कर येऊन तो खाली पडला होता. त्यानंतर त्याच्या नाक, तोंडातुन फेस येऊन जागीच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे नातेवाईक शुभम कुलकर्णी याने उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणिता मात्रे यांनी गणेश कुलकर्णी यास मयत घोषीत केले आहे.ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. गणेश कुलकर्णी हा एका खासगी कंपनीत मजुर म्हणून काम करत होता.त्याच्या पश्चात पत्नी,14 महिन्याचा मुलगा,आई व वडील असा परिवार आहे. बिडकिन आणि परिसरात घटनेची माहिती मिळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.


शवविच्छेदन अहवालानंतर खात्रीशीर माहिती मिळेल - वैद्यकीय अधिकारी 


याबाबत वैद्यकीय अधिकारी प्रणिता मात्रे यांनी माहिती दिलीय की, बिडकिन येथील मयत गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, तर शवविच्छेदन अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत खात्रीशीर माहिती मिळेल. असं त्या म्हणाल्या


 


रुग्णालयात 100 च्या घरात रुग्ण दाखल


छत्रपती संभाजीनगर शहराचे तापमान 39 अंश सेल्सियसवर गेल्याने रुग्णालयांमध्ये रोज उष्माघातसदृश त्रासाचे रुग्ण दाखल होतांना पाहायला मिळत आहे. संभाजीनगर  महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांत 40 आणि खासगी रुग्णालयांमध्ये 50 असे एकूण 100 च्या घरात रुग्ण दाखल होत आहेत. कुणाला चक्कर येणे, मळमळ, उलटी, डोके दुखणे असा त्रास होत असल्याच्या तक्रारी रुग्ण करतायत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे...


 


हेही वाचा>>


Summer Heat : राज्यात तब्बल 33 जणांना उष्माघाताचा फटका! आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा, विदर्भात 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज