Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media)  आक्षेपार्ह आणि दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टचे प्रमाण वाढल्याने आता पोलीस देखील अलर्ट झाले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) ग्रामीण पोलिसांकडून 24 तास सोशल मीडिया पेट्रोलिंग करण्यात येत आहे. तसेच सोशल मिडीयाचे माध्यमांतून धार्मिक व जातीय भावना दुखावुन दोन समाजात तेढ निर्माण होतील असे स्टेटस, व्हिडीओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकुर, एसएमएस, तयार करून प्रसारित करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. तर आतापर्यंत अशा 80 लोकांवर गेल्या तीन महिन्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली आहे. 


सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची हयगय न करता त्यांच्या विरुध्द सक्त कारवाई करण्यात येणार आहे. सामाजिक शांतता खराब करून अशांतता होईल असे वातावरण निर्माण करणाऱ्या  व्यक्तींविरुध्द कलम 153, 153 (अ), 295 (1) भादंवी कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहाचा रस्ता दाखवला जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आक्षेपार्ह, वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाईला सामोर जावे लागणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर 1 जानेवारी ते 17  मार्चपर्यंत एकुण 80 व्यक्ती विरोधात वरील नमुद कलमानुसार 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस ठाणे खुलताबाद, सिल्लोड ग्रामीण, वैजापुर, पिशोर (प्रत्येकी 02 गुन्हे) तर पाचोड, बिडकीन, कन्नड शहर, फुलंब्री, गंगापुर (प्रत्येकी 01) गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा...


पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे, जेणेकरून त्यांच्याकडुन प्रक्षोभक किंवा समाजमन दुखावले जातील अशा आशयाचे मत कोणत्याही सोशल माध्यमांतून दिले जाणार नाही यांची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश प्रमाणात 19 ते 30 वयोगटातील तरुण मुलांचा समावेश आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नये, अथवा फॉरवर्ड करू नये, तसेच कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देतांना संयम बाळगावा. प्रतिउत्तर देतांना अपशब्दांचा वापर झाल्यास हा सुद्धा अपराध आहे. कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने दुष्ट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी अगर चिन्हाद्वारे तसेच दृश्य देखाव्याद्वारे (Visible Representation) त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. 


पोलिसांच्या सूचना.... 



  • नागरिकांनी सोशल मीडियाचे माध्यमांतून पसरविण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची सर्व प्रथम खात्री करणे अत्यावश्यक आहे.

  • पोलीस सर्व परिस्थीतीला हाताळण्यास सक्षम असून सायबर पोलीस टिम तंत्रज्ञान व विशेष दुलच्या साहय्याने सर्व प्रकारच्या सोशल मीडिया साईटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

  • पोलिसांची सोशल मीडिया पेट्रालिंग नियमित सुरु असते. 

  • सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कारवाई केली जाणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


पोलीस आयुक्तांच्या आशीर्वादाने हप्ते वसुली, विमानाने पोहचतात पैसे; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप