छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षांमध्ये दोन पक्षांमध्ये फूट पडली होती. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएममध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र  कार्यकारी अध्यक्ष गफ्फार कादरी पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. गफ्फार कादरी यांनी बैठक बोलावली होती त्या बैठकीत त्यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले. इम्तियाज जलील भाजपला मदत करतात असा आरोप देखील त्यांनी केला. कादरी यांच्या आरोपांवर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.


गफ्फार कादरी यांचे इम्तियाज जलील यांच्यावर आरोप


एमआयएमचे नेते गफ्फार कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्तियाज जलील हे भाजपाला मदत करतात असं देखील कादरी म्हणाले आहेत.


आपल्याला पक्षात डावलले जात असून, इम्तियाज जलील यांच्याकडून आपली उमेदवारी कापून भाजपच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गफ्फार कादरी यांनी केला आहे. यापुढे पक्षात राहायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी कादरी यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 


वरिष्ठांकडे तक्रार पण न्याय मिळत नाही


गफ्फार कादरी यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली होती.असदुद्दीन ओवैसी आणि अकबर ओवैसी यांच्याकडे तक्रार करून देखील आपल्याला न्याय मिळत नाही नसल्याचे कादरी यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांचं म्हणणे ऐकून लवकरच आपण निर्णय घेणार असल्याचं कादरी म्हणाले आहेत. 


कोण आहेत गफ्फार कादरी?


गफ्फार कादरी एमआयएम पक्षातील महत्वाचे नेते आहेत. एमआयएमध्ये गफ्फार कादरी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांनी दोनवेळा निवडणूक लढवली होती. गफ्फार कादरी यांचा 2014 मध्ये चार हजार मतांनी पराभव झाला होता. तर,  2019 मध्ये   14 हजार मतांनी पराभव झाला होता. भाजप मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात त्यांना दोनवेळा पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. 


दरम्यान, गफ्फार कादरी यांनी केलेल्या आरोपांवर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. इम्तियाज जलील गफ्फार कादरी यांच्या आरोपांवर काय उत्तर देतात याकडे देखील लक्ष लागलंय. 


इतर बातम्या :


Congress : हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसमोर मोठं चॅलेंज, महाराष्ट्रात ठाकरे-पवार अन् झारखंडमध्ये सोरेन यांच्याशी जुळवून घ्यावं लागणार