मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणुकीत(Haryana Assembly Election Result 2024) भाजपनं सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. भाजपनं 90 पैकी 48 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम ठेवली. काँग्रेसची कामगिरी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील निकालापेक्षा सुधारली असली तरी ते बहुमताजवळ पोहोचू शकले नाहीत. काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळवण्यात यश मिळालं. हरियाणात  अपक्षांनी 3 आणि भारतीय लोकदलानं 2 जागा जिंकल्या. हरियाणामधील पराभवानंतर काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. देशातील प्रमुख राज्य असलेल्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आहे.  त्यासोबत झारखंड राज्यातील निवडणूक देखील होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मित्र पक्षांना सन्मान देऊन जुळवून घेण्याची भूमिका काँग्रेसला घ्यावी लागेल. 


महाराष्ट्रात जागा वाटपात ठाकरे पवारांशी जुळवून घ्यावं लागेल


महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीत आहे. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन  प्रमुख पक्ष आहेत. हरियाणातील पराभवानंतर जागा वाटपाच्या चर्चा फार न लांबवता त्यावर निर्णय घेत महाविकास आघाडीतील नेत्यांना लोकांपर्यंत जावं लागणार आहे. लोकसभेत काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळाला होता. त्याच प्रकारची कामगिरी विधानसभेला करायची असल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला संयुक्तपणे सामोरं जावं लागेल. जागावाटपात मित्र पक्षांना सन्मान देत काँग्रेसला काही ठिकाणी तडजोड करावी लागू शकते.  महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्ता मिळवायची असल्यास काँग्रेसला मित्रपक्षांना सन्मान देत जुळवून घ्यावं लागेल. 


झारखंडमध्येही आघाडी धर्माला बळ द्यावं लागेल


झारखंड राज्यात अनेक आव्हानांचा सामना करुन देखील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या सरकारनं पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. आता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वात पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागू शकतं.  काँग्रेसला झारखंडमध्ये देखील मित्रपक्षाला सोबत ठेवावं लागेल. 


लोकसभा निकालानंतर काँग्रेससमोर पुन्हा आव्हान


लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं चांगली कामगिरी केली होती. काँग्रेसच्या खासदारांची संख्या देखील वाढून 99 पर्यंत पोहोचली होती. हरियाणामध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. तर, जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सोबत त्यांनी आघाडी केली होती. तिथं नॅशनल कॉन्फरन्ससोबत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. 


दरम्यान, महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीला सामोरं जायचं असल्यास काँग्रेसला पुन्हा एकदा आघाडीधर्म बळकट करावा लागेल. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली तिथं, काँग्रेसनं विजयाची संधी गमावल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे. त्यामुळं काँग्रेसच्या नेतृत्त्वाला भाजपशी लढताना नव्यानं रणनीती आखावी लागणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान नंतर हरियाणात भाजप विरुद्धच्या थेट लढतीत काँग्रेसला अपयश आलं.


इतर बातम्या :


Haryana : हरियाणामध्ये पुन्हा कमळ फुलले, बहुमताचा आकडा पार करत भाजपची हॅट्रिक, काँग्रेसचे स्वप्न भंगले


Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता, 49 जागांसह पूर्ण बहुमत, PDP चा सुपडासाफ