औरंगाबाद : जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांमध्ये आतापर्यंत 396 जनावरांना लम्पीची लागण (Lumpy Skin Disease) झाल्याचे आढळून आले आहे. या आजाराचा फैलाव जनावरांमध्ये होऊ नये, यासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. जिल्ह्यात एकूण गायवर्गीय पशुधन 5 लाख 38 हजार 572 इतके असून, त्यापैकी 396 जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. झोड यांनी दिली आहे.
लम्पी आजाराची लक्षणे
लम्पी आजारामध्ये जनावरांना ताप येतो. चारा व पाणी कमी घेतले जाते किंवा बंद होते. नाका डोळ्यातून चिकट स्त्राव येतो. जनावरांच्या अंगावर गाठी येतात आणि पायावर सूज येऊन जनावर लंगडते. अशी सर्वसाधारण लक्षणे लम्पी या चर्मरोगाची दिसून येतात.
प्रशासनामार्फत उपाययोजना
लम्पी आजाराचा उद्रेक आढळताच जिल्ह्यात गोवर्गीय जनावरांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत 3 लाख 69 हजार 526 जनावरांचे म्हणजेच 69 टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरण सुरु असून पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
बाधित जनावर इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. बाधित जनावराबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयास सूचना द्यावी. जनावरांवर उपचार करुन घ्यावेत. पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी आजारासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून पशुपालकांनी घाबरुन न जाता जनावरावर वेळीच उपचार करावे. रोग नियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये आणि बाधित गावापासून पाच किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावातील चार महिने वयावरील गाय वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. बाधित जनावरांना उपचार, औषध उपचार करुन घ्यावे तसेच रोग प्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. झोड यांनी केले आहे.
रोगप्रसाराची कारणे
या रोगाचा प्रसार डास, माशा, गोचीड, चिलटे आदीमार्फत होत असल्याने गोठ्याचे व जनावरांच्या स्वच्छतेची काळजी पशुपालकांनी घ्यावी. गोठ्यात बाह्य कीटकनाशकांची फवारणी करुन घ्यावी, रोगाची लक्षणे दिसतात उपचार आणि प्रतिबंधक उपाय पशुपालकाने करावेत.
संसर्गाची माहिती देणे बंधनकारक
प्राण्यांमधील संक्रमण आणि संसर्ग प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाची माहिती पशुपालक इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत तसेच प्रशासनास देणे बंधनकारक असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी कळवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: