छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात (Marathwada) यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जनावरांना पावसाळ्यातच चारा नाही, तर हिवाळा आणि उन्हाळ्यात त्यांना खायला काय घालावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 60 पशुपालक शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी मोफत बियाणे मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे मागणी केली आहे. जर भर पावसाळ्यात अशी परिस्थिती असेल, तर पुढील काळ चिंता वाढवणारा ठरणार आहे.
यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात जुन महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरीही ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. आता सप्टेंबरचा अर्धा महिना संपला आहे. मात्र, अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा आणि चाऱ्याच्या प्रश्न देखील गंभीर बनला आहे. पाऊस पडला नसल्याने हिरवीगार दिसणाऱ्या बंधाऱ्यावर गवत पाहायला मिळत नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जनावरांसाठी चारा खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून चारा लावण्यासाठी धडपड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आधीच खरीप पिकासाठी आहे ते पैसे टाकून बसलेल्या शेतकऱ्यांना चाऱ्याचा सामना करावा लागत असल्याने, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 60 पशुपालक शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी मोफत बियाणे मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे मागणी केली आहे. विशेष म्हणजे विभागात अनेक जिल्ह्यात अशीच काही परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशी आहे योजना?
- राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून पशुपालक शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर वैरणीचे (गवत चारा) उत्पादन घेता यावे म्हणून राज्य शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर बियाणे वाटप केले जातात.
- पूर्वी उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी ही योजना राबवली जायची.
- यासाठी लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदारांकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असावी. किमान 3 ते 5 जनावरे असावीत, जमीन पडीक, गवती कुरणक्षेत्र असावे.
- जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या योजनेंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना प्रतिलाभार्थी 1500 रुपये किमतीचे मका, न्युट्रीफिड बाजरी, नेपियर जातीच्या गवताची थोंबे वाटप केले जातात.
- अलीकडे प्राप्त 8 हजार 610 प्रस्तावांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली असून तांत्रिक मान्यता मिळताच पशुपालकांना वैराणीच्या बियाणांचा पुरवठा केला जाणार आहे.
जनावरांचा सांभाळ कसा करायचा?
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे अपेक्षित पाऊसच पडला नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. विशेष म्हणजे अनेक भागात माणसांना पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याने, जनावरांना पाणी कोठून आणावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात पाऊस चांगला झाला नसल्याने मका आणि बाजरी सारखे पिकं आधीच करपून गेली आहे. त्यामुळे त्याचा चारा म्हणून वापर देखील करणे अवघड झाले आहेत. त्यामुळे पावसाच्या उरलेल्या दिवसांत जोरदार पाऊस पडला तर ठीक, अन्यथा मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Jayakwadi Dam Update : जायकवाडी धरणातील पाण्याची आवक बंद, सध्या धरणात उरला एवढा पाणीसाठा?