छत्रपती संभाजीनगर : गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पत्नी अनुराधा दानवे यांच्यासह गणरायाचे विधिवत प्राणप्रतिष्ठा करून मंगलमय वातावरणात स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी आरती करून राज्यातील जनतेच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी यावी यासाठी प्रार्थना केली. यावेळी दानवे यांचे वडील एकनाथराव दानवे, आई सगुनाबाई दानवे, भाऊ देविदास दानवे, बाळासाहेब दानवे व राजेंद्र दानवे पत्नीसह हजर होते. तसेच मुलगा धर्मराज दानवे व मुलगी मानसी दानवे यांनी यावेळी बाप्पाची आरती केली. विशेष म्हणजे दरवर्षी दानवे कुटुंबीयांकडून मोठ्या उत्साहात बाप्पाला घरी आणले जाते. 


दरम्यान यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, यंदा खरिप हंगामात मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना आस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांनी वेढले आहे. अवघ्या जगाचे संकट दूर करणाऱ्या विघ्नहर्ताला माझी एवढीच प्रार्थना आहे की, या स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांवर आलेले हे अस्मानी संकट मिटू दे असे साकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाकडे केले. तसेच दानवे यांनी गणेश चतुर्थीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.


शेतकरी आर्थिक संकटात 


राज्यातील शेतपिके पावसाअभावी करपली गेली असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. गणेश चतुर्थी या सणाच्या प्रसंगावर शेतकऱ्यांचे भरड पिके मुग व उडीद काढण्यास येते. ज्यातून त्याला या सणांमध्ये आर्थिक मदत मिळते, परंतु यावर्षी पाऊसच न झाल्याने ही पिके आलीच नाहीत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून त्याला आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे दानवे यांनी म्हटले. तसेच देशातील केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने शासन करत असून जनतेच्या प्रश्नांपासून सतत ते पळ काढत आहेत. महांगाई व शेतकऱ्यांवर आलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीकडे डोळेझाक करत आहे. लोकांच्या दैनंदिन समस्यांकडे केंद्र शासन दुर्लक्ष करत असल्याने पुढच्या गणेश चतुर्थी पर्यंत हे हुकूमशाही व जनता विरोधी सरकार हटवणार असा इशारा दानवे यांनी दिला.


संस्थान गणपतीची प्राणप्रतिष्ठा...


दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत संस्थान गणपती येथे देखील बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. तर अंबादास दानवे यांनी देखील यावेळी हजेरी लावली. सोबतच आरती करत शहरवासीयांनी गणेशोत्सवाचा शुभेच्छा देखील दिल्या. तर, यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, येथे गणपती बाप्पा आहे. त्यामुळे याठिकाणी टीका टिप्पणी काहीच नाही. गणेशोत्सव असून सर्वांनी एकत्र मोठ्या उत्साहात साजरा करायचा. दुष्काळ टळू दे आणि पाऊस पडू दे अशी आमच्या सर्वांची मिळून गणपतीकडे मागणी असल्याचे दानवे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ganeshotsav Politics: रोज एकमेकांवर टीका करणाऱ्या नेत्यांना 'बाप्पां'नी आणले एकत्र; नेते म्हणतात राजकारणापेक्षा प्रथा परंपराचं सर्वश्रेष्ठ