Maratha Reservation Protest: छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठीच्या आंदोलनाला (Maratha Reservation Agitation)  आता काही ठिकाणी  हिंसक वळण लागले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्या आहे. त्यामुळे आता बघ्याची भूमिका न घेता हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांकडून पोलिसांना मिळाले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या आंदोलनातील 32 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी आणि रास्ता रोको केल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


या प्रकरणात गुन्हे दाखल!


पहिल्या प्रकरणात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 7 ते 8 लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात, अज्ञात 7 ते 8 ईसमांनी बिल्डा फाटा येथे विनानरवाना टायर जाळून वाहतूकीस अडथळा निर्माण करून गैरकायद्याची मंडळी जमवून बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसऱ्या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण 9 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यात, यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून रस्ता आडवून जिल्हाअधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून एक मराठा लाख मराठा, मराठयांना आरक्षण मिळालंच पाहीजे, आशा घोषणा दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तिसऱ्या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यातच दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यात 7 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात, गैरकायद्याची मंडळी जमवून रस्ता आडवून,  जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले.  एक मराठा लाख मराठा, मराठयांना आरक्षण मिळालंच पाहीजे आशा घोषणा दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चौथ्या प्रकरणात पाचोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडुळ परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी पाचोड पोलिसांनी 7 ते 8 लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.


जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश...


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. मात्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात याच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे देखील समोर आलं आहे. त्यामुळे, या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागासाठी जमावबंदीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे, या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे.