छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे या काळात कोणालाही आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चे काढण्यास परवानगी नसणार आहे. सोबतच सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या काळात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही शस्त्र किंवा शरीराला इजा पोहचेल अशा वस्तू देखील वापरता येणार नसल्याचं प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या होत्या. सोबतच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात देखील दगडफेकीच्या घटना समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रशासन देखील अलर्ट झाला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागासाठी जमाबंदीचे आदेश काढले आहे. त्यामुळे या काळात आता पाचपेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई असणार आहे.
अशी असणार जमावबंदी
- सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, सोटा, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू जवळ बाळगता येणार नाही.
- संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा अंतर्गत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास व निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई
- जाहीरपणे घोषणा देणार नाही, गाणे किंवा त्यांचे ध्वनीमुळे सार्वजनिक शांतता भंग असे वापरता येणार नाही.
- हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय कर्मचारी विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या अशा मिरवणुकीला लागू होणार नाही.
जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. मंगळवारी देखील जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असेच आंदोलन पाहायला मिळाले. पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर देखील पेटवून दिले होते. तर, जिल्ह्यातील अनेक गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण देखील केले जात आहे.