(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिंदूंनी विसर्जनाचा तर मुस्लिमांनी मिरवणुकीचा दिवस बदलला; 'दंगली'चा डाग लागलेल्या संभाजीनगरने दिला एकतेचा संदेश
दौलताबाद येथे गणेश विसर्जन गुरुवारऐवजी शुक्रवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संभाजीनगर शहरातील ईदनिमित्ताने निघणारी मिरवणूक ( जुलूस) दोन दिवस उशिराने काढण्याचा निर्णय झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा येथील दंगलीच्या घटनेनंतर वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर देखील जिल्ह्यात छोट्या-मोठ्या वादाच्या घटना समोर आल्याने शहराची राज्यभरात चर्चा झाली. मात्र, आज त्याच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील नागरिकांनी हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देऊन दंगलीचा डाग फुसला आहे. यावर्षी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद (Eid Milad) सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे, पोलिसांवर बंदोबस्ताचा पडण्याची शक्यता होती. सोबतच, कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत आणि दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी घेतलेल्या बैठकीनंतर महत्वाचा निर्णय घेण्यात आला. दौलताबाद येथे गणेश विसर्जन गुरुवारऐवजी शुक्रवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संभाजीनगर शहरातील ईदनिमित्ताने निघणारी मिरवणूक ( जुलूस) दोन दिवस उशिराने काढण्याचा निर्णय झाला आहे.
ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त दरवर्षी दौलताबादमार्गे लाखो मुस्लीम बांधव खुलताबादला जात असतात. यावेळी अंदाज 6 लाख मुस्लीम बांधव येत असतात. दरम्यान, यंदा गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद सण एकाच दिवशी आले आहे. विशेष म्हणजे, दौलताबादमधील मुख्य मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे, आज मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव दौलताबादमार्गे खुलताबादला जाणार असल्याने गणेश विसर्जन मिरवणूक देखील रस्त्यावर आल्यावर पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढू शकतो. तसेच, वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे. सोबतच कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून, गणेश विसर्जन पुढे ढकलण्याची विनंती पोलिसांनी गणेश मंडळांकडे केली होती. पोलिसांच्या याच विनंतीला मान देत दौलताबाद येथे गणेश विसर्जन गुरुवारऐवजी शुक्रवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महत्वाच्या 6 गणेश मंडळांनी आपला पाठींबा देखील दिला आहे.
ईदनिमित्ताने निघणारी मिरवणूक दोन दिवस उशिरा...
एकीकडे दौलताबाद येथील हिंदू बांधवानी ईदनिमित्ताने एक दिवस उशिरा गणेश विसर्जन करण्याचा निर्णय घेतला असतांना, संभाजीनगर शहरातील मुस्लीम बांधवांनी देखील महत्वाचा निर्णय घेत एकतेचा संदेश दिला आहे. आज शहरात मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणूका निघणार आहेत. अशातच आज ईद-ए-मिलाद सण असल्याने मुस्लीम बांधवांकडून देखील शहरात मिरवणूक काढण्यात येते. परंतु, गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने पोलिसांनी दोन दिवस उशिरा मिरवणूक काढण्याची विनंती मुस्लीम बांधवाना केली होती. पोलिसांच्या विनंतीला मान देत मुस्लीम बांधवांनी दोन दिवस उशिरा मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: