छत्रपती संभाजीनगर : गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसा प्रकार समोर आलाच तर कठोर शिक्षेची तरतूद आहे. असे असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदान केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे प्रशासन दक्ष झाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. या शहरात एका उच्चभ्रू वस्तीत गर्भलिंग निदान केले जात असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने येथे मोठी कारवाई केली आहे. येथील प्रशासनाने गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या घटनेबाबत आरोग्य अधिकारी पारस मेंडेलचा यांना अधिक माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये गर्भलिंगनिदानासाठी वापरण्यात येणारी साधनं, रोख रक्कम आदी दिसत आहे. 


नेमका प्रकार काय आहे?


सध्या एकीकडे मोठ्या उत्साहात मातृदिन साजरा केला जात आहे. दुसरीकडे मात्र मातृदिनीच गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी कारवाई  केली असून, गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भलिंगनिदान केले जात होते. ही माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचे पथकाच्या निरदर्शनास आले. आरोग्य विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली असता अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीकडूनच हे गर्भनिदान केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. 


12 लाख 78 हजार रुपयांची रोकड जप्त


या कारवाईत आरोग्य पथकाला घटनास्थळी 12 लाख 78 हजार रुपयांची रोकड मिळाली आहे. या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, टॅब देखील आढळला आहे. विशेष म्हणजे शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत इंजिनिअरिंग करणारी एक तरुणी गर्भनिदान केंद्र चालवत असल्याचा समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ   


निर्माण झाले अनेक प्रश्न? 


दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इजिनिअरिंग करणाऱ्या एका तरुणीला वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणं कशी मिळाली? सोनोग्राफीसाठी लागणारी सर्व उपकरणं या तरुणीला कोणी दिली? या तरुणीने गर्भलिंग निदान करण्यासाठीची माहिती कोठून काढली? ही तरुणी गर्भलिंग निदान कसे करत होती? आतापर्यंत या तरुणीने किती गर्भलिंग निदान केले आहेत. या तरुणीकडून गर्भलिंग निदान करून आतापर्यंत किती महिलांनी अबॉर्शन केलेले आहे? महिलांनी अबॉर्शन केले असेल तर ते कोठे केले? यामागे अन्य कोणाचा संबंध आहे? गर्भलिंग निदानाच्या या कथित रॅकेटमध्ये काही रुग्णालयांचाही समावेश आहे का? अशी अनेक प्रश्न आज उपस्थित केली जात आहेत. 


हेही वाचा :


छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब , शिंदे सरकारला दिलासा!