Chhatrapati Sambhaji Nagar  News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) कालपासून एका आंदोलनाची आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेले जुगार अड्डे बंद करावे या मागणीसाठी पोलिस आयुक्तालयासमोर अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी चक्क विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.  सावर्जनिक ठिकाणी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीनगर पोलिसांची भूमिका म्हणजे 'हम करो सो कायदा' असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. रमेश विनायक कसारे पाटील (रा. दलालवाडी) असे आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 


सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेले जुगार अड्डे बंद करण्याची मागणी रमेश पाटील यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र यावर कोणतेही कारवाई करण्यात येत नसल्याने पोलीस आयुक्त कार्यलयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला होता. या पार्श्वभुमीवर शुक्रवारी दुपारी आयुक्तालयाच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान दुपारी एक वाजता मिलकॉर्नर भागातील पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी पाटील अर्धनग्न अवस्थेत हातात लाठी घेऊन आंदोलन करण्यासाठी पोहचले. दरम्यान रमेश कसारे यांना पोलिसांनी आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ताब्यात घेतले. तसेच त्यांची उचलबांगडी करत पोलिसांच्या जीपमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेले. 


पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल... 


दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश पाटील पोलीस आयुक्तालय हद्दीतील सोशल क्लबच्या नावाने चालणारे जुगाराचे अड्डे बंद झाले पाहीजे या मागणीसाठी विना परवानगी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वापासमोर सार्वजनिक ठिकाणी पोहचला. तर महिलांना लज्जा निर्माण होईल असे अश्लील लैंगिक हावभाव करु लागला, त्यामुळे बंदोबस्तावर हजर असलेल्या फिर्यादी व इतर महिला अधिकारी व अंमलदार यांच्या मनास लज्जा वाटून त्यांचा विनयभंग झाला आहे.  तसेच आरोपीने केलेल्या कृत्यामुळे सार्वजनीक शांततेचा भंग झाला असल्याने गुन्हा दाखल करण्यात येत आहे. 


संभाजीनगर पोलिसांचा 'हम करो सो कायदा'? 


शहरातील जुगार अड्डे बंद करण्याची मागणी करण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करणाऱ्यावर चक्क विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. कारण आंदोलक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर येताच काही क्षणात पोलिसांनी त्याची उचलबांगडी करत पोलीस जीपमध्ये टाकून बेगमपुरा पोलीस ठाण्यात नेले. तसेच त्याच्या एका हातात लाठी होती तर दुसरा हात पोलिसांनी पकडला होता. पण पोलिसांच्या दाव्यानुसार महिलांना लज्जा निर्माण होईल असे अश्लील लैंगिक हावभाव केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईची शहरभरात चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


काय सांगता! पत्त्यांच्या क्लबमध्ये चक्क मुख्यमंत्री शिंदेंसह आठवलेंचा फोटो; आरपीआय जिल्हाध्यक्षांच्या घरावर पोलिसांचा छापा