Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्या अनेक वर्षापासून काळोखाच्या गर्ततेत हरविलेल्या अजिंठा लेणी (Ajanta Caves) व्हिजीटर सेंटरमध्ये एका मादी बिबट्याचा तिच्या छाव्यासह वास्तव्य असल्याची बाब समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मादी बिबट्या व्हिजीटर सेंटरच्या आवारात मुक्तसंचार करतांना दिसत असल्याने येथील सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


मंगळवारी व्हिजीटर सेंटर मधील काही कर्मचाऱ्यांना व्हिजीटर सेंटरचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनच्या चेंबरमध्ये बिबट्याने एका बछड्याला जन्म दिल्याचे दिसून आले. सुदैवाने त्यावेळी तेथे मादी बिबट्या नसल्याने कोणताही अनर्थ झाला नाही. त्यानंतर या ठिकाणापासून 100 मीटरच्या अंतरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने येथील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशत आहे.


2018 पासून हे व्हिजीटर सेंटर बंद पडलेले


अजिंठा राखीव जंगलापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फर्दापूर अजिंठा लेणी टि. पॉइंट परिसरात पर्यटन विकास महामंडळाने सुमारे 64 कोटी रुपयांचा निधी खर्च करुन सर्व साधन सुविधेने सुसज्ज असे अजिंठा लेणी व्हिजीटर सेंटर उभारले आहे. मात्र याच व्हिजीटर सेंटरला पर्यटकांचा हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने, तसेच पाणी, वीजपुरवठ्याचे लाखो रुपयांचे बिल थकल्याने पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे सन 2018 पासून हे व्हिजीटर सेंटर बंद पडलेले आहे. दरम्यान आता या व्हिजीटर सेंटरमध्ये बिबट्याच्या बछड्याचा जन्म झाला आहे. तर व्हिजीटर सेंटर परिसरात एका मादी बिबट्याचा तिच्या छाव्यासह वास्तव्य असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


काठी आणि टॉर्च बाळगण्याच्या सूचना 


व्हिजीटर सेंटर परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने सध्या तिथे जाण्यास कोणेही लवकर तयार होत नाही.  तर बिबट्याचे वास्तव्य असलेल्या व्हिजीटर सेंटरच्या परिसरात कोणीही न जाता व्हिजीटर सेंटरमध्ये तीन-तीनच्या गटाने वावरण्याच्या व सोबत काठी आणि टॉर्च बाळगण्याच्या सूचना येथील सुरक्षा रक्षकांना करण्यात आल्या आहेत. 


व्हिजीटर सेंटर मागील पाच वर्षापासून काळोखाच्या गर्ततेत हरविलेले


अजिंठा लेणीतील बंद पडलेले व्हिजीटर सेंटर जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने हालचाली सुरु केल्या होत्या. वीजपुरवठा सुरळीत सुरू केला, मात्र अद्यापपर्यंत हे व्हिजीटर सेंटर पर्यटकांसाठी खुले झाले नाही. मागील पाच वर्षापासून काळोखाच्या गर्तेत हरविलेले अजिंठा लेणी व्हिजीटर सेंटर आजही ओस पडलेलेले आहे. त्यामुळे हे व्हिजीटर सेंटर सुरु होण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाताना उग्र परफ्यूम, लाल रंगाचे कपडे‎ टाळा; अन्यथा होऊ शकतो मधमाशांचा हल्ला