Chhatrapati Sambhaji Nagar News: दिवाळीप्रमाणेच गुडीपाडवा (Gudi Padwa) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय राज्य शासनाद्वारे घेण्यात आला होता. परंतु पाडव्याच्या तोंडावर हा शिधा जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाला असल्याने अनेक ठिकाणी आनंदाच्या शिध्याचा पाडव्याच्या मुहूर्त हुकला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar) तर मंगळवारपर्यंत मागणीच्या 50 टक्केच साठा उपलब्ध झाला होता. त्यातही तेलाचे पॅकेट नसल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरिबांचा पाडवा गोड करण्यात सरकराला यश मिळाले नाही. 


दिवाळीप्रमाणेच गुढीपाडव्यालाही आनंदाचा शिधा देण्याची घोषणा करून तीन आठवडे उलटले. परंतु हा आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना वेळेच्या आत पोहचवण्याच नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने आनंदाचा शिधा शासकीय गोडाऊनपर्यंत पोहचला नाही. तर अनेक ठिकाणी पाडव्याच्या एक दिवस आधी आनंदाचा शिधा जिल्ह्यात पोहचला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत एकाही रेशन दुकानापर्यंत हा शिधा पोहोचू शकला नव्हता. जिल्ह्यात 1802 रेशन दुकाने असून, आनंदाच्या शिध्यास पात्र असलेले 5 लाख 63  हजार 417 रेशन कार्डधारक आहेत.


सरकारच्या घोषणेनंतर जिल्हा पुरवठा विभागाने कार्डधारकांच्या संख्येनुसार शासनाकडे मागणी नोंदविली होती. मात्र, पाडव्याच्या आदल्या दिवशी पुरवठा विभागाला हे पॅकेट प्राप्त होण्यास सुरुवात झाली. त्यातही मागणीच्या केवळ 50  टक्केच पॅकेट उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, त्यात साखर, रवा आणि चणाडाळीचा समावेश असून, पामतेलाचा यात समावेश नव्हता. त्यामुळे तेलाविनाच आनंदाचा शिधा वाटप करावा लागणार आहे. मंगळवारी रात्री तेलाचे पॅकेट उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण रेशन दुकानात बुधवारी देखील तेल उपलब्ध झालं नसल्याचं चित्र आहे. 


संपामुळे हुकला शिध्याचा मुहूर्त...


गेल्यावेळी दिवाळीला देखील सरकारकडून आनंदाचा शिधा शंभर रुपयात देण्यात आला आहे. पण त्यावेळी देखील वेळेत शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे अर्धाच शिधा वाटप करण्यात आले होते. त्यामुळे गेल्यावेळीचा अनुभव पाहता सरकराने यावेळी वेळेच्या आधीच आनंदाचा शिधा रेशन दुकानात पोहचवण्याचे नियोजन केले होते. पण याचवेळी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेले. यामुळे ठरलेले नियोजन विस्कळीत झाले आणि आनंदाचा शिधा वेळेत शासकीय गोडाऊनमध्ये पोहचलाच नाही. आता संप मिटला असून, होईल तेवढ्या लवकर आनंदाचा शिधा रेशन दुकानापर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. असे असले तरीही मात्र आनंदाच्या शिध्याचा पाडव्याचा मुहूर्त हुकला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


आनंदाचा शिधा! छत्रपती संभाजीनगरमध्ये रवा पोहचला, पण साखर, गोडतेलसह डाळ पोहचलीच नाही