Chhatrapati Sambhaji Nagar News: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी याच नुकसानग्रस्त भागातील शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. सत्तार यांनी आज कन्नड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत, शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 


अब्दुल सत्तार यांनी आज (19 मार्च) रोजी कन्नड तालुक्यातील पिशोर, पळशी बुद्रुक , साखरवेल शिवारात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला. तर झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे तसेच पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी असे निर्देश सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. 


दरम्यान यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, नायब तहसीलदार राजपूत, मंडळ कृषी अधिकारी सरकलवार, कृषी सहाय्यक जगदीश पवार, एकनाथ वाघ आदी अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.


संभाजीराजे यांची टीका...


राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना, सरकारकडून याबाबत ठोस पाऊले उचलले जात नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान याचवेळी संभाजीराजे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. संभाजीराजे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल,” असे संभाजीराजे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Marathwada Rain Update: अवकाळीमुळे मराठवाड्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, 62 हजार 480 हेक्टर पिकांचे नुकसान