Chhatrapati Sambhaji Nagar News: नामांतराच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले तर, महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आली आहे. नामांतराच्या समर्थनात आज शहरात शहरातील क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निघालेल्या जनगर्जना मोर्चामध्ये काही हुल्लडबाजांनी औरंगाबाद नावाच्या फ्लेक्स आणि बोर्डची मोडतोड केली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातून औरंगपुरा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजातील लोक सहभागी झाले होते. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. औरंगपुरा येथे सभा होऊन समारोप झाल्यानंतर मोर्चातून परतताना काही हुल्लडबाज तरुणाने औरंगपुरा ते क्रांती चौकापर्यंत जिथे जिथे औरंगाबाद असा फलक फ्लेक्स आहे, तो त्यांनी फाडून मोडून टाकला.
नेमकं काय घडलं!
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात आज शहरातील क्रांती चौकातून मोर्चा निघाला होता. निराला बाजार मार्गे हा मोर्चा औरंगपुऱ्यातील चौकात पोहचला. यावेळी याठिकाणी सभा देखील झाली. दरम्यान सभा संपल्यावर मोर्चेकर घरी परताना काही हुल्लडबाज तरुणांनी रस्त्यावर औरंगाबाद नाव दिसणार फ्लेक्स आणि बोर्डची मोडतोड केली आहे. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील केली. तर निराला बाजार चौकात औरंगाबाद नाव लिहलेली एक लोखंडी पाटी देखील तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच एक महाविद्यालच्या गेटजवळ लावलेला बॅनर देखील फाडण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत, या तरुणांना पांगवून लावले.
ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त...
नामांतराच्या समर्थनात काढण्यात आलेल्या मोर्च्यास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच मोर्चा संपल्यावर देखील पोलिसांचा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही पोलीस बंदोबस्त कायम आहे. निराला बाजार ,क्रांती चौक, औरंगपुरा चौकासह महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सोबतच पोलिसांकडून शहरात गस्त देखील सुरु आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तर पोलीस आयुक्त निखील गुप्ता स्वतः मोर्च्यास्थळी प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत होते.
इतर महत्वाच्या बातम्या :
छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या 'हिंदू जनगर्जना मोर्चा'ला पोलिसांनी परवानगी नाकारली