Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात 2018 मध्ये आंबे विकत घेण्याच्या वादावरून दंगल पेटली होती, आणि पाहतापाहता शाहगंज भागात दगडफेक आणि जाळपोळ झाली. त्याच छत्रपती संभाजीनगरच्या पैठण (Paithan) तालुक्यातील बिडकीन गावात रविवारी एका 'चिक्कू'वरून (Chikku) गावात दोन गट भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यात काही पाच-सहा लोकं जखमी देखील झाले आहे. विशेष म्हणजे तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण 17 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिडकीन पोलिसांत रईस शेख बाबू (वय 33 वर्षे, व्यवसाय फळविक्रेतो रा. बागवान गल्ली बिडकीन ता. पैठण जि. छ. संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 'त्यांचा अल्पवयीन भाचा बिडकीन बस स्टँड परिसरात फळाच्या दुकानात बसला होता. यावेळी तिथे कृष्णा वाघ हे चिक्कू घेण्यासाठी आले. त्यांनी चिक्कू दाबून पाहिले असता तो चिकू फुटला. यावेळी दुकानात बसलेल्या मुलाने चिक्कू फोडू नका असे म्हणल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सुरवातीला शाब्दिक वाद सुरू झाला आणि त्यांनतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यात चिकू विकत असलेला मुलगा जखमी झाला. याची माहिती फिर्यादी रईस शेख हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी आपल्या भाचाला घाटी रुग्णालयात नेले.
रईस शेख हे आपल्या भाच्याला रुग्णालयात घेऊन जात असताना आणखी काही लोकं तिथे जमा झाले. त्यामुळे पुन्हा वाद सुरू झाला. त्यामुळे काही वेळात दोन्ही गटाचे लोकं जमा झाले. दोन्ही गटाकडून एकमेकांना हाणामारी सुरू झाली. तर याचवेळी काहींनी दगड फेकून मारले. तसेच एकाने बाजूला असलेल्या सळूनच्या दुकानातून आणलेला वस्तारा मारल्याने त्यात एक जखमी झाला. या संपूर्ण राड्यात पाच-सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर बिडकीन शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दोन्ही गटाच्या लोकांना पांगवले.
गावात तणावाचे वातावरण
बिडकीन हे गाव आधीपासूनच संवेदनशील समजले जाते. त्यातच रविवारी बिडकीन बस स्टँड परिसरात दोन गटात वाद झाल्याने गावात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच, दोन्ही गटाचे नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून, पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. तसेच, पोलिसांकडून गावात पतसंचलन देखील करण्यात आले. सध्या गावात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त मात्र कायम आहे.
गावात शांतता, अफवांवर विश्वास ठेवू नका...
दरम्यान, या प्रकरणी माहिती देताना बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे म्हणाले की, 'बिडकीन बस स्टँड परिसरात चिक्कूवरून दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत काही लोक जखमी झाले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. गावात सध्या शांतता असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत.
हे ही वाचा :