औरंगाबाद : भारताचे चांद्रयान चंद्रावर जाऊन पोहचले आणि जगभरात भारताच्या नावावर इतिहास कोरला गेला. भारताने केलेल्या प्रगतीची यामुळे जग नोंद घेत आहे. मात्र, त्याच भारताच्या एका गावात आज शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. अवघी 7 वर्षांचे लेकरू जीव मुठीत धरून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावरून शाळा गाठत असल्याचे चित्र औरंगाबादच्या (Aurangabad) भिवधानोरा गावात पाहायला मिळत आहे. गंगापूर तालुक्यातील हे गाव असून. या मुलांना जायकवाडी धरणाच्या एक किमी बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावर बसून प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे हा मतदारसंघ केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांचे आहे. 


अथंग पाण्याचा साठा, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी आणि याच पाण्यात विषारी सापांचा धोका. हेच विषारी साप थर्माकोलच्या तराफ्यावर येऊन बसू नयेत म्हणून मुलांच्या हातात काठीचा सहारा आणि मनात जीवघेण्या प्रवासाची भीती. हे चित्र कोणत्याची आदिवासी पाड्यावरील नसून, आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. बर धरणाच्या बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावर बसून एक किलोमीटरचा प्रवास केल्यावर हा संघर्ष थांबत नाही. कारण नदीपात्रातून बाहेर पडताच घनदाट गवत आणि एक फूट पाण्यातून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. एवढंच नव्हे तर पाण्यात शेतकऱ्यांनी टाकलेल्या विद्युत मोटारीचा धोका देखील कायम असतो. अंगावर शहारे आणणारा हा प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून भिवधानोरा गावातील विद्यार्थी करतायत. विशेष म्हणजे पोटच्या लेकरांचा हा जीवघेणा प्रवास पाहता अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं आहे. 


भिवधानोरा गावातील बहुतांश गावकरी शेतीच करतात. बाजूलाच जायकवाडी धरण असल्याने गावातील नागरिक शेतीला प्राधान्य देतात. दरम्यान काही वर्षांपूर्वी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे गावाचे दोन भाग झाले आणि काही वस्ती बॅकवॉटरच्या पलीकडेच वास्तव्यास राहिली. त्यामुळे वस्तीवरील गावकऱ्यांना बॅकवॉटर ओलांडूनच गावाच्या बाहेर पडावे लागते. तब्बल 47 वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. दरम्यान, आपण आयुष्यभर शेती केली असली तरीही मुलांना चांगल शिक्षण मिळावे या अपेक्षेने पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. गावातील 20 ते 25 मुलं रोज शाळेत हातात. पण त्यांना देखील जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरवरून एक किलोमीटरचा प्रवास करूनच शाळा गाठावी लागते. बरं यासाठी शासनाकडून साध्या बोटची देखील व्यवस्था करून देण्यात आली नाही. त्यामुळे मुलं सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावरून प्रवास करतात. देश जरी प्रगती करत असला तरीही त्याच देशात साधं शिक्षण घेणं देखील जीवघेणं ठरतोय यापेक्षा खेदाची गोष्ट काय असणार आहे. 


नेत्यांची नुसतीच घोषणाबाजी... 


भिवधानोरा गावातील नागरिकांच्या व्यथा काही नवीन नाही. अनेकदा माध्यमांमध्ये याबाबतीत बातम्या आल्या आहेत. त्यानंतर नेतेमंडळी खडबडून जागे होतात आणि आश्वासनाच पाऊस पाडून निघून जातात.  विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भिवधानोरा गावचा मुद्दा उपस्थित केला होता. पण गावात जाण्यासाठी पूल तयार करावा लागणार असून यासाठी 90 कोटी रुपये लागतील. त्यामुळे हा खर्च जलसंपदा विभाग करू शकत नाही, पण ग्रामविकास, बांधकाम विभाग करू शकतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI