औरंगाबाद : जिल्ह्यात पावसाचा (Rain) खंड पडल्याने खरीप हंगामाची स्थिती बिकट झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाचा 16 ते 40 दिवसांचा खंड पडला आहे. 20 महसूल मंडळात सलग 21 किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला असून, तेथील पिकांच्या उत्पादनात 50 टक्के घट येणार असल्याचा अंदाज तालुकास्तरीय समितीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पीक विमा (Crop Insurance) योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता याबाबीखाली शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना जारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. यामुळे 321 गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक आज घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, विमा कंपनी, स्कायमेट प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.


या बैठकीत माहिती देण्यात आली की, औरंगाबाद जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र 6,84,716.4 हेक्टर इतके असून, त्यापैकी 658123.24 हेक्टर पेरणी झाली आहे. ऑगस्ट 2023 अखेर 431.2 मिमी पर्जन्यमान अपेक्षित असतांना प्रत्यक्षात केवळ 276.6 मिमी म्हणजेच 64.14 टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात 16 ते 40 दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. परिणामी खरिप पिकांची अवस्था बिकट आहे 


321 गावांतील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम नुकसान भरपाई 


पेरणीपासून एक महिना झाल्यानंतर सलग 21 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा कालावधी पावसाचा खंड असलेली 20 महसूल मंडळे जिल्ह्यात आहेत. त्यात औरंगाबाद तालुक्यातील 4, फुलंब्री तालुका 1, वैजापूर तालुका 10 व गंगापूर तालुक्यातील 5 महसूल मंडळे आहेत. या मंडळांअंतर्गत 321 गावे असून त्यांचे सर्व्हेक्षण तालुकास्तरीय समितीमार्फत झाले आहे. तालुकास्तरीय समितीच्या अहवालानुसार मका, कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पीक विमा योजनेतील मध्यहंगाम प्रतिकूलता याबाबीखाली मका, कापुस व सोयाबीन या पिकांचा विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई होते, ही बाब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिली. 


त्यानुसार पावसाचा सलग 21 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक खंड असलेल्या 20 महसूल मंडळातील 321 गावांमधील पीक विमा संरक्षित शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याबाबत अधिसुचना जारी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज दिले.


जिल्ह्यातील परिस्थिती 


सद्यस्थितीत औरंगाबाद तालुक्यातील 4 महसूल मंडळांतील 68 गावे, फुलंब्री तालुक्यातील एका मंडळातील 24 गावे, वैजापूर तालुक्यातील 10 मंडळातील 133 गावे, गंगापूर तालुक्यातील 5 मंडळातील 96 गावे अशा एकूण 20 मंडळातील 321 गावांमधील पीक विमा संरक्षित शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे,अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली.


संबधित बातमी: 


Crop Insurance : पाऊस न पडल्याने झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळणार नाही; विमा कंपनीच्या कॉल सेंटरकडून शेतकऱ्यांना अजब उत्तर