औरंगाबाद : जालना (Jalna Protest) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation) जाहीर करावे, या मागणीसाठी सुधाकर शिंदे शेकटा येथील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. या टॉवरची उंची जवळपास 122 फूट आहे. टॉवरच्या सर्वांत शेवटच्या टोकावर बसून शिंदे हे आरक्षणाची मागणी करीत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते. मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा सुधाकर शिंदे यांनी घेतल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमा झाले आहेत. विशेष म्हणजे शिंदे हे काल दुपारपासून टॉवरवर चढले असून, त्यांनी अन्नाचा कणही खाल्ला नसल्याचं सांगण्यात येत आहे.


जालना येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी असेच काही आंदोलन पाहायला मिळत आहे. दरम्यान, करमाड परिसरातील शेकटा गावात सुधाकर शिंदे नावाच्या व्यक्तीने चक्क 122 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केला आहे. काल दुपारपासून हे आंदोलन सुरू आहे. तर कालपासून टॉवरवर चढलेल्या शिंदे यांनी अन्नाचा कणही खाल्ला नाही. विशेष म्हणजे आता त्यांच्यासोबत संपर्कही होत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, शिंदे यांना खाली उतरण्याची विनंती केली जात आहे. 


आरक्षणाचा निर्णय घ्या!


शेकटा येथील सुधाकर शिंदे यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केल्याने, घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात गावकरी देखील जमा झाले आहेत. प्रशासनाकडून शिंदे यांना खाली उतरण्याची कालपासून मागणी केली जात आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय होईपर्यंत आपण खाली येणार नसल्याचं शिंदे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून खाली येण्यासाठी शिंदे यांची मनधरणी केली जात आहे. पण शिंदे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.


संपर्कही तुटला!


सुधाकर शिंदे यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळतात गावकरी घटनास्थळी जमा झाले. तर घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते. त्यानंतर शिंदे यांना फोनवरून संपर्क करून त्यांना खाली उतरण्याची विनंती केली जात होती. मात्र, आज सकाळपासून शिंदे यांचा संपर्क देखील तुटला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पोलिसांकडून शिंदे यांना खाली उतरण्याची विनंती केली जात आहे. पण संपर्क तुटल्याने त्यांचं म्हणणं पोलिसांपर्यंत पोहोचत नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


हे ही वाचा :