Aurangabad News : मागील काही दिवसांपासून कचरा वर्गीकरणाबाबत औरंगाबाद महानगरपालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) सतत जनजागृती करण्यात येत आहे. तर, 1 ऑगस्टपासून ओला आणि सुका कचरा वेगळा असल्याशिवाय घेऊ नयेत असे आदेश मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मात्र, असे असतांना अजूनही काही भागातील नागरीक ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने देण्यास नकार देत आहे. त्यामुळे यापुढे कचरा ओला-सुका असा वेगळा करुन दिला नाही, तर दंड ठोठावला जाणार आहे. तसेच यास विरोध करणाऱ्यास अथवा कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यांना, कचरा वर्गीकरण बाबत अडथळा निर्माण केल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिला आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम- 2000 नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे. उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादानेही तसे आदेश दिले आहेत. परंतु, शहरातील अनेक नागरिक अजूनही घंटागाडीत ओला व सुका कचरा एकत्र पद्धतीने देतात. त्यामुळे प्रक्रिया करताना प्रचंड त्रास होतो. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. 'हम होंगे कामयाब'अंतर्गत कचरा वर्गीकरणासाठी कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. तर 1 ऑगस्टपासून ओला आणि कोरडा कचरा एकत्र घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कचरा वर्गीकरण न करणाऱ्या आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड करण्याची सूचना यापूर्वीच दिलेली आहे. त्याअनुषंगाने कचरा स्वीकारणारे, उचलणारे कर्मचारी काम करत आहेत. परंतु, हे करत असताना काही भागात त्यांना विरोध होत आहे. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे. पण असे करणाऱ्यांवर आता मनपातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
शिवीगाळ करणाऱ्याचे प्रशासकाकडून प्रबोधन
जुनाबाजार येथे एका नागरिकाने स्वछता कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच सदर कचरा असाच मिक्स येईल, असे कर्मचाऱ्यांना सांगितले. सदरील घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत हे इंदोरला होते. त्यांनी त्या नागरिकाला इंदोरला असतानाही फोन लावून त्यास उत्तर दिले. त्याला समजही दिली. मनपा सफाई कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे अतिशय अयोग्य आणि असहनिय आहे. नागरिकांनी त्यांच्याशी व्यवस्थितरित्या बोलावे. जर कोणीही महापालिकेचे स्वच्छता बाबत व इतर कोणत्याही कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे बाबतची कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही प्रशासक जी. श्रीकांत स्पष्ट केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मनपा आयुक्त जेव्हा कचऱ्याचं वर्गीकरण करतात; स्वतःच डस्टबीनचा कचरा केला वेगळा