Aurangabad Crime News : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरात नशा करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली असून, आता उच्चभ्रू महाविद्यालयीन युवक देखील नशेच्या आहारी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहर पोलिसांनी केलेल्या एका कारवाईनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या तरुणांनी पुण्यात एक पार्टी केली. ज्यात हे तरुण गांजा आणि चरसच्या माध्यमातून नशा करत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. दरम्यान याची गंभीर दखल घेत औरंगाबादचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सापळा लावला होता. त्यानंतर अखेर तरुणांना गांजा, चरस आणि एमडी सारखे नशेली पदार्थ पुरवणाऱ्या एकाला बेड्या ठोकण्यात आले आहे. अनिल माळवे (वय 51 वर्ष) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 


औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तांच्या पथकाने अचानकपणे शहरातील चार ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेतीन किलो गांजा, 1.2 ग्रॅम एमडी, 4.5 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी रेकोर्डवरील गुन्हेगार अनिल माळवे याला अटक केली आहे. माळवे याच्यावर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. तर माळवे उच्चभ्रू तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना गांजा, चरस अशा नशेचे पदार्थ पुरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना त्याच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणारे पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहे. 


कोण आहे अनिल माळवे? 


औरंगाबाद शहर पोलिसांनी छापेमारी करत अटक केलेला माळवे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. तो सुरवातीला घरफोड्या करायचा. त्यानंतर नशेच्या धंद्यांत उतरला. सध्या तो शहरातील पुंडलिकनगर भागात राहतो. उच्चभ्रू तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना हवा ते आणि हव्या तेवढ्या प्रमाणात नशेचे साहित्य तो उपलब्ध करून देतो. विशेष म्हणजे स्वतः जवळ तो कमी प्रमाणात ड्रग्स, चरस आणि गांजा ठेवत असे,  जेणेकरून पकडला गेला तरी अधिकची कारवाई होऊ नये. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील N,  N4 भागातील उच्चभ्रू भागातील अनेक तरुणांना त्याने आपल्या जाळ्यात ओढले आहे. तर काही दिवसांपूर्वी शहराजवळ असलेल्या दौलताबाद येथे अशीच नशेखोरांची एक मोठी पार्टी झाली असल्याची माहिती मिळत आहे. 


असा उघड झाला सर्व प्रकार...


औरंगाबादचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या वार्डातील एका अधिकाऱ्याचा मुलगा नशेच्या आहारी गेला होता. दरम्यान, या तरुणाच्या पालकांच्या हाती आपल्या मुलांचा ड्रग्स पार्टी करतानाचा व्हिडीओ लागला आणि त्यांना धक्काच बसला. त्यांनी याबाबत तत्काळ याची माहिती प्रमोद राठोड यांना देऊन यावर काहीतरी मार्ग काढावा लागणार असल्याचे सांगितले. राठोड यांनी तत्काळ औरंगाबादचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची भेट घेऊन त्यांना सर्व घटनेची माहिती दिली. पोलिसांनी नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाला विश्वासात घेऊन नशेसाठी साहित्य पुरवणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली आणि माळवेचं नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या चार ठिकाणी छापेमारी केली. ज्यात माळवेला देखील ताब्यात घेण्यात आले. तसेच तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि नशेचे साहित्य विकणाऱ्या लोकांवर धडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Crime : औरंगाबाद शहरात पोलीस आहेत की नाही? आता भरदिवसा व्यावसायिकाची तीन लाख रुपये असलेली बॅग लंपास