Aurangabad Crime News : औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज महानगर परिसरात जमिनीवरून सुरु असलेल्या वादातून परस्परांवर चाकू, तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जमिनीच्या वाटणीवरून भावकीतील मंडळींमध्ये हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. मात्र हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, दोन गट थेट आमने-सामने आले. ही घटना (20 जुलै) रोजी घडली असून, या वादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर या प्रकरणी राजेश तुकाराम साळे (वय 35 वर्षे, रा. गट न.86 अयोध्या नगर वडगाव कोल्हाटी, औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून चार लोकांविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात मुकेश उर्फ बबलू त्रिंबक साळे, अभिषेक त्रिंबक साळे, ऋषिकेश त्रिंबक साळे, त्रिंबक आसाराम साळे असे आरोपींचे नावं आहेत. 


वाळूज भागात वडगाव कोल्हाटीत राहणाऱ्या तुकाराम साळे व त्यांच्या भावकीतील त्रिंबक साळे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरु आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. मागील आठ वर्षांपासून दिवाणी न्यायालयात दोन्ही भावाचा वाद सुरू असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, असे असतांना 20 जुलै रोजी सकाळी तुकाराम साळे यांची मुले एकनाथ साळे, उद्धव साळे, नातू मयूर व ट्रॅक्टरचालक बाळासाहेब वाहुळे हे शेतातील कामासाठी गेले होते. यावेळी त्रिंबक साळे व त्यांची मुले मुकेश ऊर्फ बबलू, ऋषिकेश यांनी त्यांना शेतात काम करण्यास नकार दिला. यावरून तांच्यात शाब्दिक चकमक उडाली आणि एकनाथ यांनी लहान भाऊ राजेशला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर राजेश देखील शेतात पोहचले. तर वाद सुरु असताना, मुकेश ऊर्फ बबलूने शेतातील कामासाठी आलेल्या चुलतभावंडांना शिवीगाळ करून तुम्ही शेतातून जा अन्यथा जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. 


थेट तलवारीने हल्ला


दरम्यान, हा वाद सुरू असताना मुकेश ऊर्फ बबलूने रागाच्या भरात भाऊ एकनाथ व उद्धव साळे यांच्यावर तलवारीने वार केला. यावेळी राजेश साळे हे मदतीसाठी गेले असतांना ऋषिकेश साळेने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा गळा दाबला. तसेच त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला, मात्र तलवारीचा वार चुकवताना राजेश साळे यांच्या खांद्याला जखम झाली. त्यांच्या मदतीसाठी आलेले पुतण्या मयूर साळे व ट्रॅक्टरचालक बाळासाहेब वाहुळे हे देखील मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Crime : औरंगाबाद शहरात पोलीस आहेत की नाही? आता भरदिवसा व्यावसायिकाची तीन लाख रुपये असलेली बॅग लंपास