Aurangabad Crime News : थेट टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करुन ते व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणाऱ्या लोकांविरोधात औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. धोकादायक पद्धतीने टँकरमधून गॅस भरणाऱ्या तिघांना सातारा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 52 लाख 68 हजार 883 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, जावेदखान मोहम्मद मुनाफ (वय 40 वर्षे, रा. डी-8, ममर्डा कॉलनी, कोकरीनगर, सायन, कोळीवाडा, वडाळा, मुंबई), शेख अफसर शेख बाबुमियाँ, (वय 35 वर्षे, रा. राजेंद्रनगर, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर) व कदीर शेख अब्दुल रज्जाक (वय 35 वर्षे रा. गल्ली क्रमांक 23, इंदिरानगर, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 


पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लिंक रोड गोलवाडी शिवार येथे माऊली हॉटेलच्या बाजूला एका एचपी कंपनीच्या टँकरमधून गॅस सिलेंडरमध्ये चोरुन भरले जात आहे. त्यामुळे सातारा पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. तसेच, या पथकाने त्या ठिकाणी पाहणी केली असता, लिंक रोडवर मोकळ्या जागेत अंधारात एक एचपी कंपनीचा टँकर (MH -12-NX –733) दिसला. तसेच, टँकरच्या बाजूला एक मारुती सुझुकी कंपनीचा टेम्पो क्रमांक (MH-20-EL-0520) उभा होता. तर, टेम्पोमध्ये व्यवसायिक वापराचे सिलेंडर ठेवलेले होते. यावेळी LPG ने भरलेल्या टँकरच्या पाईपला रबरी नळी लावून हा गॅस चोरुन नोझलद्वारे व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरत असताना तीनही आरोपी सापडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 


आरोपींना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी याची माहिती पुरवठा अधिकारी यांना देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. पुरवठा अधिकाऱ्यांनी तीनही संशयित आरोपींकडे विचारपूस केली. तसेच, टँकरचालकाला विचारले असता त्याने सांगितले की, हा टँकर मुंबईतील गॅस कंपनीतून गॅस भरुन चिकलठाणा येथे एचपी गॅस डेपोमध्ये जात आहे. मात्र, आपण यातील आरोपी शेख अफसर शेख बाबु व कदीर शेख अब्दुल रज्जाक यांना रिकाम्या व्यवसायिक सिलेंडरमध्ये टँकरमधून 800 रुपयांमध्ये एक सिलेंडर याप्रमाणे गॅस भरुन देत असल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 





पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल...



  • 40 लाख रुपये किमतीचा गॅस टँकर

  • 7 लाख 37 हजार 133 रुपये किंमतीचा 20.167 टन टँकरमधील गॅस 

  • 12 हजार 250 रुपये किंमतीचे अंदाजे 19 किलो वजनाच्या LPG गॅसने भरलेले 7 नग व्यवसायिक सिलेंडर

  • 14 हजार 500 रुपये किंमतीचे रिकामे 29 नग व्यवसायिक गॅस सिलेंडर

  • 5 हजार रुपये किमतीची रबरी नळी व नोझल

  • 5 लाख रुपये किमतीचा टेम्पो

  • एकूण किंमत 52 लाख 68 हजार 883 रुपये किमतीचा मुद्देमाल


यांनी केली कारवाई..


सदरची कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, प्रभारी अधिकारी पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त, उस्मानपुरा विभाग, डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, सपोनि. विनायक शेळके, पोउपनि देवीदास शेवाळे, पोउपनि, भंडारे, पोह.सुनिल धुळे, पोशि.दीपक शिंदे, पोशि. सुनिल पवार, पोशि. अजित लोंढे, पोशि. अनिल राठोड, पोशि. मुरमुरे, पोशि. अभय भालेराव, चालक पोना. राऊत यांनी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Crime News : ट्रक चालकांना गावठी कट्टा दाखवून लुटायचे; आंतरजिल्हा टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या