Sharad Pawar in Beed : शरद पवारांची (Sharad Pawar) आज बीडमध्ये (Beed) स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी जाहिर केल्याप्रमाणे आज बीडमध्ये सभा घेणार आहेत. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार काय बोलणार? धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) थेट टीका करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर शरद पवार औरंगाबादहून बीडकडे निघाले आहेत. तसेच, औरंगाबाद (Aurangabad) शहरातून निघाल्यानंतर कार्यकर्ते शरद पवारांसोबत बीडकडे निघतील. रस्त्यात ठिकठिकाणी त्यांच्या सत्कार केला जाणार असून, गेवराईमध्ये बदामराव पंडित यांच्याकडे ते जाण्याची शक्यता आहे. पुढे, बीड बायपासपासून शरद पवार यांच्या रॅलीला सुरुवात होईल. ती रॅली शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या सभा स्थळापर्यंत पोहोचेल. तर याच सभेत पुण्यातील गुप्त भेटीवर शरद पवार भाष्य करुन, कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याची शक्यता आहे. 


अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपसोबत घरोबा केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा ही नाशिकच्या येवलामध्ये घेतली. त्यानंतर दुसरी सभा मराठवाड्यात होत आहे. अजित पवारांना साथ देत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील बहुतेक नेते अजित पवारांसोबत ठेवण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. म्हणूनच, शरद पवारांनी मराठवाड्यातील पहिली स्वाभिमान सभा बीडमध्ये ठेवली आहे.


राजकीय घडामोडीत कायमच संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. सत्तेत असताना आणि विरोधी बाकावर बसले असतानाही शरद पवारांसोबत कायम बीड जिल्हा आघाडीवर राहिला आहे. म्हणूनच, मराठावाड्यातील पहिली जाहीर सभा ही बीडमध्ये होत आहे. अर्थात याला दुसरे कारण म्हणजे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे बीडचे आहेत. 


संदीप क्षीरसागर यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी...


राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यावर बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र मोठ्या पवारांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच संदीप क्षीरसागर यांच्यावर पवारांनी जिल्ह्याची जबाबदारी टाकली. नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेल्या संदीप क्षीरसागर यांनी पवारांच्या सभेची जय्यत तयारी केली. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. बीडमधील सभा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याचा दौरा केला. विशेष म्हणजे परळीत जाऊन कोणालाही घाबरू नका असे सांगून धनंजय मुंडेनाही आव्हान दिले.


धनंजय मुंडेंना पहिला धक्का...


बीडमध्ये होणाऱ्या स्वाभिमान सभेमध्ये परळीतील बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पहिल्याच जाहीर सभेत परळी विधानसभा मतदारसंघातील नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन पवार यांनी धनंजय मुंडेंसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. बबन गित्ते यांनी यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम केल्यानंतर बबन गित्ते त्यांनी जनक्रांती सेना स्थापन केली होती. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


शरद पवारांच्या बीडमधील सभेविरोधात अजित पवारांची उत्तर सभा? धनंजय मुंडेंकडून सभेचं आयोजन