Aurangabad Crime News : औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज भागात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, मंदिरातून घराकडे निघालेल्या चार वर्षीय बालिकेवर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. वाळूज जवळील पंढरपूर येथे गुरुवारी (17 ऑगस्ट) रोजी रात्रीच्या सुमरास ही घटना घडली आहे. तर, याप्रकरणी वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासात जेरबंद केले आहे. संभाजी होनाजी धवारे (वय 35 वर्षे, रा. सारा विहार वाळूज मूळ गाव रा. दैठण ता. गेवराई जि.बीड) असे आरोपीचे नाव आहे. तर, पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती जाणून घेतली. 


चिमुकलीचे घर पंढरपूर येथील एका मंदिराच्या पाठीमागेच आहे. दरम्यान याच मंदिरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मंदिरात दररोज हरिपाठ असतो. त्यामुळे, नेहमीप्रमाणे चिमुकली हरिपाठ सुरू झाल्यावर मंदिरात गेली होती, तर तिची आई घरीच होती. मात्र, ती मंदिरात धिंगाणा करीत असल्याने तिच्या बहिणीने तिला घरी पाठवून दिले. ती मंदिराच्या बाहेर पडली त्याच वेळी आरोपी कंपनीतून त्याच रस्त्याने घरी परतत होता. अंधाराचा फायदा घेत त्याने चिमकलीचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला.


आरोपी संभाजी धवारे एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 11 च्या दरम्यान आरोपीने चिमुकलीचे अपहरण केले. तिच्यावर अत्याचार केला. चिमुकलीला वेदना होत असल्याने कुटुंबियांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तिची विचारपूस केल्यावर संतापजनक प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या घटनेने पंढरपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


तासाभरात आरोपी ताब्यात, आयुक्तांची घटनास्थळी भेट 


या प्रकरणी गुन्हा दाखल होताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीच्या शोधासाठी तातडीने पथक स्थापन केले. पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित यांच्या नेतृत्वात पोलीस कॉस्टेबल प्रियंका तलावडे, कॉस्टेबल मतलबे, साळवे, सोहळे, डागे यांचे पथक स्थापन केले. रात्रीच मुलीच्या पालकांना सोबत घेत परिसर पिंजून काढला. आरोपीच्या वर्णनावरुन शोध घेतला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. तर, या धक्कादायक घटनेची पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी गंभीर दखल घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत ते पोलिस पथकाच्या संपर्कात होते. तसेच, दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी पंढरपूर परिसराला भेट देत तपासात काय प्रगती झाली याची माहिती घेतली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Crime News : ट्रक चालकांना गावठी कट्टा दाखवून लुटायचे; आंतरजिल्हा टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या