औरंगाबाद: मागील काही दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यातच पावसाचा (Rain) खंड पडल्याने पिंकावर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अनेक फवारण्या करून देखील पिकांवर रोग कमी होत नाही. त्यामुळे या सर्व परिस्थितीला वैतागून औरंगाबादच्या (Aurangabad) सोयगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने रोगाने ग्रासलेल्या कपाशीला (Cotton) उपटून फेकले आहे. 


सोयगाव तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी धूळपेरणीवर कपाशीची लागवड केली आहे. सुरुवातीला आलेल्या पावसामुळे आणि शेतकऱ्यांनी खुरपणी करत खताचा डोस दिल्याने झाडेही चांगली मोठी झाली. पण, आता पावसाने पाठ फिरवल्याने या पिकावर रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. तर, फवारणी साठी लागणारा खर्च परवडणारा नाही. त्यात पावसाचा अंदाज नाही. अशा सर्व परिस्थितीमुळे सोयगाव परिसरात असलेल्या विष्णू गव्हांडे, संजय वाघ, प्रमोद वाघ, प्रमोद बावस्कर, रमेश वाघ, भरत बावस्कर या सहा शेतकऱ्यांनी 150 हेक्टरवरील कपाशी उपटून फेकली आहे.


सोयगावसह परिसरात पावसाचा मोठा खंड आणि कपाशीच्या पिकांवर झालेल्या विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयगाव परिसरात शेतकरी उद्विग्न झाले आहेत. रोगाने ग्रासलेल्या आणि वाढ खुंटलेल्या कपाशीपासून शेतकऱ्यांना कोणतेही भवितव्य दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी सरळ कपाशी उपटणे सुरू केले आहे. यात आतापर्यंत कपाशीवर केलेला सर्वच खर्च पाण्यात गेला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कपाशीवर रोगराई आल्यानंतरही कृषी विभागाकडून कोणत्याही उपाययोजना मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहे. शेवटी कपाशीचे पीक सांभाळणे म्हणजे 'नाकापेक्षा मोती जड' अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट कपाशी उपटून फेकण्याचा निर्णय घेतला आहे. 


पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत... 


या वर्षी मृग नक्षत्रात साधारण पडलेल्या पावसावर पुढे पाऊस पडेल, या आशेवर औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. थोडाफार पाऊस झाल्याने पिकाची उगवण ही झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पाऊस न पडल्याने आणि कडक उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत. पावसाळा सुरू असून चार नक्षत्र संपले तरीदेखील अपेक्षित पाऊस झालेला नाही. खरीप पिकात वाढलेले तण काढण्यासाठी खुरपणी, कोळपणी यांची कामे सुरू आहेत. मशागतीमुळे शेतातील जमिनीचा वरचा थर मोकळा होऊन खाली थोडाफार असलेला ओलावाही नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर पडत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Paddy sowing : देशात भात लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ, तर तेलबियांसह कापूस लागवडीत घट; वाचा कृषी मंत्रालयाची आकडेवारी