Paddy sowing : देशात यावर्षी भात लागवडीच्या (Paddy sowing) क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयानं (Ministry of Agriculture) दिलेल्या माहितीनुसार भात लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत देशात 328.22 लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशात 312.80 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. तर या खरीप हंगामात 11 ऑगस्टपर्यंत कडधान्य, तेलबिया, कापूस आणि ताग यांच्या लागवडीत घट झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. 


आसाम, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये भात लागवड क्षेत्रात घट


मागील वर्षीचा विचार करता यावर्षी देशात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी लागवड झाली आहे. कमी लागवड झालेल्या राज्यांमध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. या खरीप हंगामात आतापर्यंत ओडिशात  18.97 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे. जी मागील वर्षी याच हंगामात 20.356 लाख हेक्टर होती. त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशात यावर्षी 6.86 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 8.28 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली होती. तर आसाममध्येही यावर्षी 14.92 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 16.25 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. भरड तृणधान्य क्षेत्राच्या लागवडीच किरकोळ वाढ झाली आहे. खरीप हंगामात आतापर्यंत लागवडीखालील क्षेत्र हे 171.36 लाख हेक्‍टरवर पोहोचले आहे. जे मागील वर्षीच्या याच हंगामात 167.73 लाख हेक्‍टर होते.


तेलबियांच्या लागवडीत घट तर ऊसाच्या लागवडीत वाढ


कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, चालू खरीप हंगामात 11 ऑगस्टपर्यंत कडधान्यांचे पेरणी क्षेत्र हे 113.07 लाख हेक्‍टर आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी याच कालावधीत 122.77 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. तेलबियांच्या लागवडीच्या क्षेत्रातही किरकोळ घट झाली आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 183.33 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी याच कालावधीत 184.61 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. या खरीप हंगामता ऊसाच्या लागवड क्षेत्रात मात्र थोडी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत 56.06 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. मागील वर्षीचा विचार केला तर याच कालवधीत  55.20 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती.


खरीप पिकांचे लागवडीचे एकूण क्षेत्र हे 979.88 लाख हेक्टरवर


दरम्यान, कापसाच्या लागवडीत देखील थोडी घट झाली आहे. आत्तापर्यंत 121.28 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी याच कालावधीत कापसाच 122.53 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. तर तागाच्या लागवडीतही घट झाली आहे. आत्तापर्यंत 6.56 लाख हेक्टर क्षेत्रावर तागाची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच तालावधीत 6.95 लाख हेक्टर होती. चालू खरीप हंगामातील 11 ऑगस्टपर्यंत सर्व खरीप पिकांचे लागवडीचे एकूण क्षेत्र हे 979.88 लाख हेक्टर झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 972.58 लाख हेक्टर होते. म्हणजे एकूण लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sindhudurg News: कोकणात मान्सूनने हुलकावणी दिल्याने भात उत्पादक शेतकरी अडचणीत, खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या