Amit Deshmukh in Beed : एकीकडे सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीत (अजित पवार गट) यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. मंत्री पद, पालकमंत्री पद आणि विकास निधीवरून आपल्यावर अन्याय होत असल्याचे आरोप केले जात आहे. मात्र, अशातच काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढायला मिळत नव्हती. कारण आघाडीच्या राजकारणामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खूप मोठा अन्याय झाला, असल्याचे देशमुख म्हणाले आहेत. 


बीडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीचे महत्त्वाचे बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, अमित देशमुख म्हणाले की, यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढायला मिळत नव्हती. कारण आघाडीच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खूप मोठा अन्याय झाला. आता जर पक्षाला आपली ताकद वाढवायची असेल तर ती संधी आम्ही सोडणार नाहीत. कार्यकर्त्यांना जर निवडणूक लढवायची संधी दिली तरच पक्ष आणि संघटना वाढणार असल्याचे देशमुख म्हणाले. 


लोकसभेसह विधानसभेच्या सर्व जागा लढवणार


राज्याची सध्या बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता येणाऱ्या काळात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवारांची जिंकून येण्याची क्षमता आहे. ज्या पक्षांमध्ये निवडणुका जिंकण्याची क्षमता आहे, अशाच पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार आहे. जी संघटना लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, तळागाळामध्ये काम करत आहे अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळणार असल्याच अमित देशमुख म्हणाले आहेत.


गोपीनाथ मुंडे- विलासराव देशमुख असते तर...


विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे जर असते तर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती वेगळी राहिली असती. आता सध्या वाटाघाटीचे राजकारण सुरू असून, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला छेद झाला आहे. तर देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राची भूमिका ही आतापर्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. मात्र, सध्या सत्तांतरासाठी ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्या महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभा देणार नसल्याचे देशमुख म्हणाले आहेत. 


काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण 


बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण असून, एनडीएने मान्यता दिली तर जिल्हयातील सहा विधानसभा आणि लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष लढविण्यास तयार असल्याचे अमित देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. देशात काँग्रेस पक्षाने मोठी उभारी घेतली असून, पक्षाची ताकद वाढली आहे. जिल्हयातील काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अशा परिस्थितीमध्ये सर्व घटक पक्षांनी संधी दिली तर जिल्हयातील सहाही मतदार संघात काँग्रेस पक्षाचे आमदार निवडूण आणू. तसेच लोकसभा मतदार संघात देखील काँग्रेसचा उमेदवाराचा विजय होईल असेही देशमुख यावेळी म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


शरद पवारांच्या विचारामुळे बीड जिल्ह्याच्या मतदारांनी चार आमदारांना निवडून दिलं : रोहित पवार