औरंगाबाद : आधी जून महिना आणि आता ऑगस्टही कोरडा गेल्याने मराठवाड्यावर (Marathwada) पाण्याचे मोठं संकट उभं राहिले आहे. याचा मोठं फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसानं ओढ दिल्याने काही दिवसापूर्वी हिरवीगार दिसणारी पिकं आता अक्षरशः करपू लागली आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील शेकडो नव्हे तर हजारो एकरवरील पिकांची राखरांगोळी झाली आहे. पाऊस पडला नाही तर पुढच्या आठ दिवसात शेतकरी शेतातही जाणार नाही अशी परिस्थिती आहे. स्वप्न डोळ्यादेखत खाक होताना त्याला पहावणार नाही, त्यामुळे आता शेतात येण्याचंच बंद करणार असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. 


गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच ओसंडून वाहणारी धरणे आता भर पावसाळ्यात भेगाळली आहेत. अनेक छोटे-मोठे पाझर तलाव कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे गुराढोरांना पिण्यासाठी पाणी कुठून आणायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दोन-चार गावांची तहान भागवण्यासाठी, शेतीला पाणी मिळावं यासाठी अनेक गावात पाझर तलाव बांधण्यात आली आहे. मात्र, वैजापूर तालुक्यातील सगळी पाझर तलाव कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे काही तलावातून गावांच्या पाणीपुरवठा योजनेला पाणी पुरवले जाते. पण, आता या गावांचा देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर, टँकर सुरु करण्यात येत आहे.मात्र, टँकरमध्ये देखील पाणी कोठून आणणार असा प्रश्न प्रशासनाला पडत आहे. 


जनावरांना विकण्याची वेळ...


औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वैजापूर तालुक्यातील काही गावं आहेत. वैजापूर तालुका एरवी पाण्याने डबडलेला, पण आता त्याच तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे. लोणी सर्कलच्या परिसरात असलेल्या तलवाडा गाव मेंढपाळासाठी प्रसिद्ध आहे. या गावात 35 ते 40 हजार मेंढ्यावर गावकरी उपजीविका भागवतात. पण, आता ह्या मेंढ्या त्यांना विकावे लागतील असं त्यांचं मत आहे. कारण इथे प्यायला पाणी शोधण्यासाठी दोन अडीच किलोमीटर जावे लागते. तर मेंढ्यांना चारा, पाणी आणायचा कुठून हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याविना डोळ्यासमोर मेंढ्यांना मरतांना पाहण्यापेक्षा त्यांना विकण्याचा निर्णय मेंढपाळ घेत आहे. 


मक्याच्या पिकांचा चुरा...


पाऊस पडत नसल्याने वैजापूर परिसरात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. लोणी खुर्द भागात मोठ्या प्रमाणात मका पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने मकाचे पिकं अक्षरशः करपून गेली आहे. त्यामुळे मुळापासून तर वरच्या शेंड्यापर्यंत मक्याची झाडं वाळून गेली आहे. झाडाला हात लावल्यावर त्याचा चुरा होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे शेकडो एकरमध्ये अशीच परिस्थिती आहे. मोठा खर्च करून पीक जगवली, डोक्यापर्यंत वाढवली. पण आता त्याला फळ लागण्याची वेळ आल्यावर पिकं डोळ्यासमोर जळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Agriculture news : मराठवाड्यात पावसाची ओढ, डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची राख रांगोळी