Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकांना काही विशिष्ट नेत्यांकडून खंडणी मागितली जात असल्याची तक्रार उद्योजकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मात्र ग्रामीण पोलिसांनी प्रत्यक्षात अशा तथाकथित नेत्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली असून, पैठण एमआयडीसीमधील उद्योजकाला चार कोटींची खंडणी मागणाऱ्या एका कामगार नेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. विष्णू आसाराम बोडखे (वय 57 वर्षे रा. संेटपॉल, मुधलवाडी ता. पैठण) असे या आरोपी नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.आय.डी.सी पैठण पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एम.आय.डी.सी. मुधलवाडी मधील एका नामवंत कंपनीच्या उघोजकासह त्यांच्या कंपनी व्यवस्थापकाला वारंवार बोडखे धमक्या देत होता. तसेच कंपनीमध्ये जावुन कंपनी मालक व इतर अधिकारी यांना मारहाण करण्याच्या प्रयत्न करायचा. तसेच कंपनीच्या कारभाराविरोधात विविध सरकारी विभागात खोटे तक्रारी अर्ज देवून कंपनीची बदनामी करायचा. तर हा त्रास थांबवायचा असेल तर चार कोटी रूपये द्यावे लागतील अशी मागणी करून तात्काळ पाच लाख रुपये रोख व 20 हजार रूपये महिना खंडणीची मागणी देखील त्याने केली होती. 


त्यामुळे, या त्रासाला कंटाळून कंपनी उद्योजक व व्यवस्थापन अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांची भेट घेवून तक्रार केली. विष्णू बोडखेकडून खंडणीसाठी होणाऱ्या मागणीबाबत सर्व प्रकार सांगितला. तर कंपनीचे मालक व व्यवस्थापन अधिकारी यांना कंपनीत येवून तुम्ही कंपनी कशी चालवता हेच बघतो म्हणून धमक्या द्यायचा. तसेच तक्रारी अर्ज मागे घेण्यासाठी वारंवार धमक्या देवून पैशाची मागणी करत असल्याचं पोलीस अधीक्षक यांना सांगितले. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ तक्रारीची गांभिर्याने दखल घेत गुन्हा दाखल करुन आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्यानुसार अखेर पैठण एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. 


शहर पोलिसांकडून कधी कारवाई होणार? 


विशेष म्हणजे वाळूज, चिखलठाणा, शेंद्रा भागातील उद्योजकांना काही विशिष्ट नेत्यांकडून खंडणी मागितली जात असल्याची तक्रार उद्योजकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तसेच अशीच परिस्थिती असल्यास उद्योजकांना उद्योग इतर ठिकाणी हलवण्याची वेळ येऊ शकते असेही उद्योजकांना बोलावून दाखवले होते. त्यामुळे शहर पोलिसांकडून अशा लोकांवर कारवाई होईल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. पण ग्रामीण पोलिसांनी मात्र ही बाब गंभीरतेने घेऊन खंडणी मागणाऱ्या नेत्यांविरोधात थेट कारवाईला सुरवात केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: