zadipatti theatre news today : विदर्भातील झाडीपट्टीचे ज्येष्ठ कलावंत डॉ.परशुराम खुणे (parshuram Khune Padmashree) यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. झाडीपट्टी नाट्यसृष्टीच्या एखाद्या कलावंताला पद्मश्री सारखा पुरस्कार घोषित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानिमित्ताने अतिशय लोकप्रिय असलेली मात्र तेवढीच उपेक्षित असलेली झाडीपट्टी रंगभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


विदर्भातील समृध्द मात्र तितकीच उपेक्षित असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीचे हे कलावैभव अफाट आहे. आपल्या राज्याच्या पूर्वेकडील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांच्या प्रदेशास झाडीपट्टी असे संबोधले जाते. हा संपूर्ण प्रदेश घनदाट जंगलांनी व्यापलेला असल्याने या प्रदेशाला 'झाडीपट्टी' असेही म्हणतात.  याच भागात सादर होणाऱ्या नाटकांना झाडीपट्टीची नाटकं किंवा झाडीपट्टी रंगभूमी असं नाव पडलं.


फक्त शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या झाडीपट्टीतील लोकांच्या रक्तात नाटकाचे वेड आहे. शेतीचा हंगाम संपला म्हणजे झाडीपट्टीत नाटकांना अक्षरश: उधाण येते. नाटक हा विषय येथील लोकांसाठी केवळ रंजनाचा भाग नसून एक उत्सवच असतो. नाटक निर्मितीपासून तर सामान्य प्रेक्षकांच्या आस्वादापर्यंतची सर्व प्रक्रिया म्हणजे एक विलक्षण लोकचळवळ आहे असेही म्हणता येईल. झाडीपट्टी रंगभूमीला 125  ते 150  वर्षांची नाटयपरंपरा असल्याने पुरावे आहेत. दंडार या स्थानिक लोककलेतून तिचा उगम झाला. सुरुवातीला तीचे स्वरुप पूर्णपणे संगीतप्रधान होते. संगीत स्वयंवर, सौभद्र, मत्स्यगंधा, संशयकल्लोळ, एकच प्याला यासारख्या संगीत नाटकांच्या सुरांनी झाडीपट्टी बहरली, मोठी झाली. 


सुरुवातीच्या काळात गॅस बत्तीच्या उजेडात आणि लाऊडस्पिकरशिवाय मोठ्याने संवाद फेकून कलाकार आपला अभिनय सादर करायची. या नाटकांसाठी कुठलीच नाट्यगृहं तेव्हाही नव्हती आणि आजही नाहीत.. तर नाटकातील कलाकार स्थानिक लोकांच्या मदतीने रंगमंच तयार करायची.


पूर्वीच्या काळी गावागावामध्ये बैलांच्या शंकरपटानिमित्त नाटकांचे आयोजन केले जायचे. ज्या गावात दिवसभर शंकरपट त्या गावात रात्री नाटक हे समीकरण तेव्हाही होतं आणि आजही आहे. नाटकांच्या निमित्ताने घराघरात पाहूण्यांची गर्दी होते आणि याच निमित्ताने लग्न करण्याच्या उद्देशाने मुलासाठी मुली पाहण्याचा कौटुंबिक सोहळा पार पाडला जात असे. किंबहूना नाटकांच्या माध्यमातून वर-वधू संशोधन हा त्यांचा प्रमुख उद्देश असायचा. या गर्दीत पाहुण्यांची जेवण्याची सोय नीट होते मात्र हा काळ थंडीचा असल्याने त्यांच्या झोपण्याची-पांघरुणाची व्यवस्था करणे कठीण असते त्यामुळे रात्री सुरू झालेलं नाटक अगदी पहाटेपर्यंत सादर होतं.


स्थानिक लोकांच्या नाट्यप्रेमापायी सुरू झालेली ही झाडी पट्टी रंगभूमी आता मोठा व्यवसाय झाली आहे. दरवर्षी भाऊबीज ते होळीपर्यंत झाडीपट्टी नाटकांचा हा हंगाम असतो... साधारण नोव्हेंबर ते एप्रील या पाच महिन्याच्या काळात झाडीपट्टीच्या वेगवेगळया गावांमध्ये जवळपास तीन हजार नाटयप्रयोग सादर होतात. या 4 जिल्ह्यात तब्बल 100 च्या वर नाटक कंपन्या असून त्यांच्या माध्यमातून किमान 10  हजार कलाकार, तंत्रज्ञ आणि व्यावसायिकांना रोजगार मिळतो तर एका हंगामात किमान 70  कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल होते.


सुरुवातीला स्थानिक कलावंत नाटक सादर करायचे, स्त्री पात्र देखील पुरुष करायचे, विशेष म्हणजे तेव्हा कलाकारांना मानधन मिळायचं नाही तर लोकांनी दिलेल्या बक्षिसातून कलाकारांना बिदागी मिळायची पण आता मुंबई-पुण्याचे अनेक प्रतिथयश कलाकार काम करातात आणि यासाठी त्यांना लाखो रुपयांचं मानधन देखील मिळतं.


नाट्यशास्त्राचे कुठलेच नियम झाडीपट्टीला लागू नाहीत असा आरोप नेहमी होत असतो. तरी इथली नाटकं लोकांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल असतो. एकाच गावात अनेक नाट्यप्रयोग सादर होऊन देखील एका प्रयोगाचा दुसऱ्या प्रयोगाला त्रास होत नाही. विशेष म्हणजे करमणुकीसोबतच अंधश्रध्दा, हुंडाबळी, राजकारण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि मुलींचं शिक्षण यासारखे अनेक सामाजिक विषय या  नाटकांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले गेले. त्यामुळे ही नाट्यचळवळ पुढे नेण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी रास्त मागणी करण्यात येत आहे.



झाडीपट्टीतील स्थानिक निर्माता, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते यांच्या काही नाट्यकृती या अत्यंत मौलिक आहेत. मात्र सरकार दरबारात आणि मुख्य नाट्य प्रवाहात ही नाट्य चळवळ नेहमीच उपेक्षित राहिली. मात्र गेले 50 वर्ष या रंगभूमीची सेवा करणाऱ्या डॉक्टर परशुराम खुणे यांना पद्मश्री जाहीर झाल्याने या झाडीपट्टी रंगभूमीचा खऱ्या अर्थाने सम्मान झालाय.


लोकाश्रय लाभलेली तुफान लोकप्रिय असलेली आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी अशी नाट्य चळवळ झाडीपट्टी रंगभूमीशिवाय कुठेही सापडणार नाही. डान्स हंगामा सारखे काही विभत्स प्रकारांमुळे या नाट्यचळवळीला गालबोट लागतंय हे जरी खरं असलं तरी सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरात देखील ही झाडीपट्टी रंगभूमी आपलं अस्तित्व कायम ठेवून आहे हे देखील एक आश्चर्यच म्हणावं लागेल.